पेण ः प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे हे सरकार आहे. जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नऊ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाला. त्याचे सेलिब्रेशन नाही, तर कम्युनिकेशन करीत जनतेपर्यंत जायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 1) पेण येथे पत्रकार परिषदेत केले. आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख अतुल कासेकर, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, नीलिमा पाटील, गीता पारेलचा, डी. बी. पाटील आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाची सर्वप्रथम 2014 साली शपथ घेतली. त्याचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात मोदी सरकारने विविध घटकांसाठी आणि क्षेत्रांमध्ये योजना आणल्या. मुलींसाठी शिक्षण, आरोग्य योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा फुले योजना, जन धन योजना यांसारख्या अनेक योजना जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ जनतेला झाला पाहिजे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. रायगडावर 2 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 350वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. या सोहळ्याला मंत्रिमहोदय, लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.