प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे, अशा शब्दांत दरेकर यांनी टीकास्त्र सोडले.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाला शुक्रवारी (दि. 16) एक वर्ष पूर्ण झाले, मात्र या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याने हा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरेकर यांनी शुक्रवारी मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण केले. त्या वेळी ते बोलत होते. पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही, असे दरेकर म्हणाले.
राज्य सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी मशाल पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपले मौन सोडावे आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीदेखील दरेकर यांनी केली.
दरम्यान, दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधू-महंतांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे या वेळी दरेकर यांनी सांगितले.