पोलादपूर : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात छप्परावरील कौले उडालेली पोलादपूर तालुक्यातील परसुले गावामधील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये ही शाळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर तसेच इमारतींवर कोसळल्या. शहरात पावसाचे काही थेंब पडले मात्र ग्रामीण भागात विशेषत: कापडे बुद्रुक ते सावित्री, ढवळी आणि कामथी नद्यांचा त्रिवेणी संगम तसेच पैठण, देवपूर, तुटवली, परसुले भागात वादळीवार्याने थैमान घातले होते. परसुले गावातील प्राथमिक शाळेची इमारत गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळात छप्पराची कौले उडून गेल्याने क्षतीग्रस्त झाली होती. त्यानंतर या शाळा इमारतीची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळामध्ये या शाळेच्या छप्परावरील सिमेंटचे पत्रे पुन्हा उडून गेले. तीन वर्गखोल्यांचे नुकसान झाले. पोलादपूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी बुधवारी सकाळी परसुले येथे जाऊन शाळा इमारतीच्या नुकसानीची पाहणी केली. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात परसुले शाळेच्या छप्पराची कौले उडून फुटली होती. ग्रामस्थांनी लोकवर्गणी तसेच शासनाकडून आलेल्या नुकसान भरपाईची रक्कम वापरून जुन्याच इमारतीवर लोखंडी छप्पर टाकून त्यावर सिमेंटचे पत्रे बसविले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळात हे लोखंडी छप्पर आणि सिमेंटचे पत्रे उडून गेल्याची माहिती कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी दिली.
मंगळवारी झालेल्या वादळी पावसात परसुले शाळेचे लोखंडी छप्पर आणि सिमेंटचे पत्रे उडून गेले आहेत. महसूल विभागामार्फत या नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर शासनाला अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर प्राप्त होणार्या निधीनुसार ही शाळा इमारत पुन्हा उभारण्यात येईल. -श्री. कांबळे, कनिष्ठ अभियंता, तालुका पंचायत समिती, पोलादपूर