Breaking News

नेरळ-माथेरान मिनीट्रेन 10 जूनपासून पावसाळी सुटीवर

शटल सेवा राहणार सुरू

माथेरान : रामप्रहर वृत्त
पर्यटकांचे आकर्षण नेरळ-माथेरान मिनीट्रेन म्हणजे माथेरानची राणी 10 जूनपासून पावसाळी सुटीवर जाणार आहे. माथेरान-अमन लॉजदरम्यान धावणारी मिनीट्रेनची शटलसेवा पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे.
सन 1907मध्ये माथेरान मिनीट्रेनची सेवा सुरू झाली होती. 2005च्या अतिवृष्टीचा अपवाद वगळता ही मिनीट्रेन अव्याहतपणे पर्यटक प्रवाशांना सेवा देत आहे. शतकमहोत्सव साजरा केलेल्या मिनीट्रेनची वाहतूक दरवर्षी पावसाळ्यात बंद असते. या कालावधीत इंजिन, डब्बे दुरुस्तीच्या कामासाठी परळ आणि कुर्डूवाडी येथील लोको शेडमध्ये नेले जातात, तर मिनीट्रेनच्या  21 किमी मार्गावरील किरकोळ दुरुस्तीची कामे रेल्वेचे कर्मचारी पूर्ण करीत असतात. नेरळ-माथेरान या रेल्वेमार्गचा मोठा भाग हा घाटातील असून मिनीट्रेनच्या मार्गात नेहमी दरड कोसळणे आणि झाडे तसेच दगड, माती रूळावर येण्याच्या घटना घडत असतात. या सर्व प्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेस्तव नेरळ-माथेरान मिनीट्रेन पावसाळ्यात बंद ठेवली जाते.
या वर्षीदेखील मिनीट्रेन 10 जूनपासून पावसाळी सुटीवर जाणार आहे.नेरळ येथून माथेरानकरिता शेवटची मिनीट्रेन 10 जूनला सकाळी 8.50 रवाना होईल आणि माथेरान येथून दुपारी 4 वाजता ती आपली या पर्यटन हंगामातील शेवटची फेरी प्रवाशांना घेऊन नेरळकरिता सुटेल. त्यानंतर थेट 15 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरानकरिता मिनीट्रेन पुन्हा प्रवाशांच्या दिमतीला हजर होईल.
असे असले तरी मिनीट्रेनची माथेरान-अमनलॉज अशी शटलसेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. अपवाद वगळता मिनीट्रेनची शटलसेवा ही संततधर पाऊस असेल तर बंद असते. त्यामुळ पावसाळ्यामध्येदेखील प्रवाशांना मिनीट्रेनची सैर अमनलॉज-माथेरान स्टेशनदरम्यान करता येणार आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply