पर्यटकांची गर्दी वाढली
कर्जत : बातमीदार
नाताळनंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे कर्जत चारफाटा येथे रविवार (दि. 26)सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती.
कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून, या तालुक्यातील फार्महाऊसेस आणि रिसॉर्टमध्ये वीकेण्डला गर्दी होते. नाताळ सणापासून कर्जत तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागते आणि नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर पर्यटक परतीचा प्रवास सुरु करतात. यंदा शनिवारी नवीन वर्षाचा शुभारंभ होत असून, दुसर्या दिवशी रविवार येत असल्याने 2 जानेवारीपर्यंत कर्जत तालुका गजबजलेला राहणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली असून मुंबई, पुणे येथून कर्जतला येणारे रस्ते वाहनांनी ़फुलले आहेत.
कर्जत तालुक्यात प्रवेश करण्यासाठी चौक भागातून एकमेव रस्ता चारफाटा येथे येत असल्याने त्या भागाला शनिवारपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कर्जत चारफाटा येथून कर्जत शहर तसेच मुरबाड आणि माथेरानकडे जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे प्रत्येक वीकेण्डला चारफाट्यावर वाहतूककोंडी होत असते. नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कर्जत तालुक्यात आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे कर्जत चारफाटा परिसरात रविवारी मोठि वाहतूक कोंडी झाली. पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन केले नसल्याने स्थानिकांसह बाहेरून येणार्या वाहनचालकांना येथील वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाची तंबी
कर्जत तालुक्यात दोन हजाराहून अधिक फार्महाऊसेस आणि सुमारे दोनशे रिसॉर्ट आहेत. तेथे येणार्या पर्यटकांमुळे कोरोना किंवा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यक्रमांवर लावलेले निर्बध लक्षात घेऊन कर्जत तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. रिसॉर्टमध्ये रात्रीचे कार्यक्रम आयोजित करण्यावर बंधने आणली आहेत. दोन डोस झाले नसतील त्या पर्यटकांना प्रवेश देऊ नये, असे आदेश सर्व रिसॉर्ट मालकांना बजावण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.