जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत यावर मंथन करण्यात आले. पक्षाचे प्रभारी एस. के. पाटील यांच्याकडेदेखील ही मागणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बुधवारी अलिबाग येथील काँग्रेस भवनात झाली. या बैठकीला रायगड जिल्हा प्रभारी चारूलता टोकस, सहप्रभारी राणी अग्रवाल, सहप्रभारी श्रीरंग बर्गे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बर्गे यांनी मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे स्पष्ट केले. तशी मागणी आम्ही केली आहे. काल काँग्रेसचे प्रभारी एस. के. पाटील यांची भेट घेऊनही याबाबत चर्चा केली. महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असून पाटील यांनी त्याला अनुकूलता दर्शवली आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाणार असल्याचे बर्गे यांनी सांगितले.
मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले, तर शिवसेनेचा विजयी उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे आघाडीमध्ये ही जागा आम्हाला द्यावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महाडच्या जागेवर आमचा दावा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी या वेळी म्हटले.
दरम्यान, या बैठकीत रायगड जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये राजेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, शबिस्ता अन्सारी यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर 29 उपाध्यक्ष, 24 सरचिटणीस, 11 चिटणीस यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.