Breaking News

कर्जतमध्ये लाभार्थी संमेलन उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी
पूर्वी योजनांचे पैसे मिळावे यासाठी लाभार्थी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकाभिमुख व पारदर्शक  कारभाराद्वारे जनतेला दिलासा दिला. मोदी सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरने भ्रष्टाचाराचा बिमोड झाला, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे केले.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे महाजनसंपर्क अभियान अंतर्गत लाभार्थी संमेलनाचे आयोजन कर्जतमधील रॉयल गार्डन सभागृहात करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
लाभार्थी संमेलनास भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, विस्तारक अविनाश कोळी, सरचिटणीस राजेश भगत, खोपोली मंडल अध्यक्ष रमेश रेठरेकर, नरेश मसणे, दशरथ वेहेले, राहुल वैद्य, शर्वरी कांबळे, संजय कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, कर्जत शहर अध्यक्ष नगरसेवक बळवंत घुमरे, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे आदी उपस्थित होते.
गेल्या नऊ वर्षांच्या काळात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी अनेक उपयुक्त योजना आणल्या. कोविड लस, मोफत धान्य, शेतकर्‍यांच्या खात्यात निधी अशा योजनांचा लाभ प्रत्येक भारतीयाला झाला. हे सत्कार्य सर्वांना कळावे व या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लोकांना मिळावा यासाठी लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी नेहमी म्हणायचे आम्ही एक रुपया पाठविल्यास लाभार्थीला केवळ पंधरा पैसे मिळतात. हे खरे असले तरी त्याचा बंदोबस्त कुणी करायचा? हे त्यांनी कळले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत जन धन खाते बँकेत उघडून कोविड काळात महिलांच्या खात्यावर तीन महिने पाचशे रुपये पाठवले आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीची झळ लागू दिली नाही. पंतप्रधान किसन योजनेंतर्गत 12 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रत्येक चार महिन्यांत दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये जमा केले जातात.
जागतिक आपत्तीतदेखील मोदी सरकारच्या योजना जनताभिमुख झाल्या आहेत. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळी अमेरिकेने त्यांना देशात येऊ देणार नाही, असे म्हटले होते. आज पंतप्रधान मोदीजी अमेरिकेला जात आहेत आणि त्यांना 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानीसाठी आमंत्रित केले आहे. मोदींजींनी आपल्या देशातील जनतेचा विश्वास संपादित केला आहे व परदेशातील लोकांचाही विश्वास संपादन केला आहे. आता आपल्या पंतप्रधानांनी आपला आर्थिक व्यवहार मोबाईलवर आणला असल्याने पैशाचे पाकीट बाळगण्याची आवश्यकता नाही.  केंद्राच्या योजना समजून घेण्यासाठी 9090902024 हा नंबर आपल्या मोबाईलवर डायल करून योजना समजून घ्या, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी लाभार्थी संमेलनाचा उद्देश सांगितला. विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी, जास्तीत जास्त मतदार नोंदणीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम केल्यास चांगले काम होईल, असे सांगितले. जिल्हा सरचिटणीस रमेश मुंढे यांनीही केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन पूर्वीच्या सरकारपेक्षा आपले सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असे स्पष्ट केले. प्रदेश सदस्य सुनील गोगटे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार यांनीही केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या यशस्वी कारभाराचा चढता आलेख सादर केला. जिल्हा सरचिटणीस राजेश भगत यांनी सूत्रसंचालन केले, तर म्हसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या संमेलनास मोठ्या संख्येने लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply