आमदार महेश बालदी यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्र्यांकडे मागणी
उरण : रामप्रहर वृत्त
मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणार्या खाजगी तेल कंपन्या व पेट्रोल पंपांना शासनाकडून देण्यात येणार्या अनुदानाप्रमाणे मच्छिमारांच्या सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये अनुदान देण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे.
आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांची सोमवारी (दि. 19) भेट घेऊन निवेदन दिलेे. या शिष्टमंडळात मार्तंड प्रसन्न कुलाबा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अमोल रोगे, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांचा समावेश होता.
या वेळी डिझेल तेल पुरवठाधारक कंपन्यांना निर्देश देण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही होण्यासाठी संस्थांच्या वतीने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांना विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे पर्ससीन पद्धतीच्या मासेमारीत येणार्या अडचणींबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.