Breaking News

प्रगल्भतेसाठी प्रयत्न हवेत

एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तम कारकीर्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या दर्शना
पवारची हत्या महाराष्ट्राला हादरवून गेली असतानाच मंगळवारी पुण्यात आणखी एका
तरुणीवर संतप्त तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याची घटना धक्कादायकच आहे. परंतु या
वैयक्तिक स्वरुपाच्या घटनांचे विरोधकांनी राजकारण न करता, त्यामागील सामाजिक-मानसिक कारणांची गंभीर चर्चा यानिमित्ताने होण्याची गरज आहे.

एमपीएससीची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण होऊन, इच्छित कारकीर्दीच्या उंबरठ्यावर
असलेल्या दर्शना पवार या तरुणीच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, अवघ्या आठवड्या-दोन आठवड्यात प्रेमप्रकरणातील नकारावरून अन्य एका तरुणीवर एका तरुणाने भर रस्त्यातकोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी पुण्यातील सदाशिव पेठेत घडली. त्या परिसरात असलेल्या एमपीएससीच्याच अन्य काही तरुणांनी या १९ वर्षांच्या तरुणीला वाचवले आणि संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यात शंतनु जाधव हा हल्लेखोर तरुण आपल्या सॅकमधून आधीपासूनच कोयता घेऊन आल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे हा हल्ला रागाच्या भरात झालेला नसून हल्ला करण्याचे ठरवूनच तो तरुण तिथे पोहोचला होता हे स्पष्ट दिसते. एकतर्फी प्रेमातून या तरुणाने आपल्यावर हल्ला केल्याचे जखमी तरुणीने म्हटले आहे. या दोन धक्कादायक घटनांमुळे विरोधकांनी त्या विषयावर राजकारण सुरू केले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था
परिस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु या दोन्ही प्रकरणांतील तपशील पाहता हीप्रकरणे नकार न पचवू शकणारी पुरुषी मानसिकताच समोर आणतात. दोन्ही प्रकरणांतील
हल्लेखोर तरुण हे नोकरीच्या व त्यासाठीच्या परीक्षेच्या तणावाचा सामना करणारे आहेत. अशा मुळातच तणावपूर्ण कालखंडातून जात असताना भावनिक ताण व निराशा सोसण्याची क्षमता गमावून बसण्यातून हे हल्ले झाले असावेत असा सूर एमपीएससीची तयारी
करणाऱ्या अनेक तरुणांनी समाजमाध्यमांवर लावला असून त्यात प्रथमदर्शनी तरी तथ्य वाटते. याआधीच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाची गेला आठवडाभर बरीच चर्चा सुरू होती. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शनाने लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या राहुल हंडोरे याने कट रचून दर्शनाची हत्या केल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल आणि दर्शना  यांचा जुना परिचय होता आणि राहुलने दर्शनाला एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यात मदत केली होती असे म्हटले गेले आहे. परंतु परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर क्लास वन अधिकारी बनणारी दर्शना आता आपल्याशी लग्न करणार नाही हे ध्यानात आल्याने चिडलेल्या राहुलने पुण्यातून धारदार कटर ब्लेड खरेदी करून दर्शनाला ट्रेकिंगच्या बहाण्याने राजगडावर नेले आणि तेथे लग्नाच्या विषयावरून बाचाबाची झाल्यानंतर तिची अत्यंत थंड डोक्याने हत्या केली. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेली महाराष्ट्रातील ही दोन प्रकरणे अनेक प्रश्न उपस्थित करतात. या प्रकरणांचे राजकारण न करता त्यामागील सामाजिक कारणांची गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्ती जेव्हा जेव्हा हत्येसारख्या गुन्ह्याकडे वळतात तेव्हा तेव्हा गुन्हेगाराच्या  नसिकतेविषयी
प्रश्न उपस्थित केले जातात. या दोन्ही प्रकरणांतील तरुण हे प्रेमप्रकरणातील नकार पचवू
शकलेले नाहीत. महाविद्यालयांमध्ये एकत्र येणाऱ्या तरुणतरुणींची जवळीक प्रगल्भ
व्हावी यादृष्टीने सामाजिक- कौटुंबिक पातळीवर काय प्रयत्न व्हायला हवेत याची चर्चा या
निमित्ताने झाल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply