महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी तसेच परळगाव, लालबाग, गिरणगाव आणि गिरगाव येथील कोकणवासीयांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणार्या रामदास बोटीच्या जलसमाधीस 17 जुलै 2023 रोजी बरोबर 76 वर्षे होत आहेत. रेवस धक्क्यापासून केवळ चार किमी अंतरावर काश्याच्या खडकावर बोट आपटून ही दुर्घटना घडली होती. त्या स्मृतींचा
घेतलेला आढावा…
अलिबाग हे या तालुक्यातील चार-पाच किलो मीटरपेक्षा जास्त आकारमान नसलेले शहर. जणू काही ते एक बेटच होते. दोन बाजूला समुद्र तिसर्या बाजूला रेवदंडा-साळावची खाडी आणि चौथ्या बाजूला धरमतरची खाडी. या खाड्यांवर त्या वेळी होडी किंवा तर याशिवाय पलिकडे जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. पलिकडून निरनिराळ्या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा मात्र कार्यरत होती. मुंबईत जाण्यासाठी निरनिराळ्या वाहनांनी प्रवास करावा लागत असे. त्यामुळे रस्त्याच्या मार्गाने प्रवास करणे त्रासदायक होते. अलिबागवरून मुंबईला जायचे म्हणजे धरमतर खाडीपर्यंत बसनंतर तर किंवा होडीनंतर पुन्हा बसने पेण, पनवेल व मुंब्रा पुढे आगगाडीने प्रवास करावा लागत असे, परंतु अलिबागपासून सुमारे 15 मैलावर असलेल्या रेवस बंदरापासून रेवस ते मुंबई ही जलसेवा अखंडपणे सुरू होती. रामदास बोटीची दुर्घटना वर्तमानकाळातील तरुण पिढीला इतिहासात जमा झाल्यासारखी आहे, परंतु रामदास बोटीच्या त्या अपघातामध्ये ज्या कळ्या उमलण्याआधीच खुडल्या गेल्या. ज्या अनेक उमलत्या फुलांचे निर्माल्य झाले, ज्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या त्या घरातील जी माणसे आज हयात असतील त्यांच्या हृदयावरची ती जखम अजूनही ओलीच असणार.
17 जुलै 1947 हा गटारी अमावस्येचा दिवस. सकाळी-सकाळीच भाऊच्या धक्क्यावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाला आपले दुपारचे जेवण कुटुंबात बसून जेवायची इच्छा होती. रामदास बोट भाऊच्या धक्क्यावरुन नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास 743 प्रवासी घेऊन रेवस धरमतरला प्रयाणास सज्ज झाली. माझे वडील कै. पांडुरंग पोसू घरत (मु. भुते, पो. थळ, ता. अलिबाग) या गावचे रहिवासी व ते तोंडलीचे व्यापारी होते. त्यांना जराही उमगले नसेल की आपला शेवटचा श्वास आज काशाच्या खडकाजवळ जाईल.
नेहमीप्रमाणे दर्याचे पाणी सळसळ कापत, मोठमोठ्याने भोंगा वाजवत तीन मजली असलेली अवाढव्य रामदास बोट मोठ्या दिमाखाने सकाळी 8 वाजता रेवस बंदराकडे निघाली. हवामान पावसाळी होते. जोराच्या, उंचीच्या लाटा होत्या. धक्क्यावर तीन नंबरचा म्हणजे तुफानी वादळाचा धोक्याचा इशारा देणारा बावटा लागला होता. असा बावटा त्याआधी बोटीने अनेक वेळा पाहिला होता. बोटीतील उतारूने अशा वादळी वातावरणात अनेक वेळा प्रवास केला होता. गटारी अमावस्या सणाचा दिवस घरचे जेवण असल्यामुळे उतारूंचे चेहरे काहीसे आनंदी झाले होते.
बोट तासाभरात बहुतांश अंतर कापून आल्यानंतर आवचित तुफान वारा सुटला. दर्यावर अचानक घनदाट काळे ढग जमा झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सोसाट्याच्या वादळाने रामदास बोट हलू लागली. दर्या चारही बाजूने फेसाळलेला होता. पुढचे काहीच दिसत नव्हते. किनारा कुठे आहे हे समजत नव्हते. मुसळधार पाऊस, फेसाळलेला दर्या, चक्रीवादळ, तुफान वारा आणि प्रचंड लाटा सुरू असल्याने बोटीच्या एका भागात पाणीही शिरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. महासागराने आक्राळ विक्राळ रूप धारण केले असल्याने पुढे काय करावे हेच कप्तानाला कळत नव्हते. बोटीवर बिनतारी यंत्राची सोय नव्हती. त्यामुळे मुंबईशी संपर्क तुटला होता. जेमतेम बोट काश्याच्या खडकाजवळ आली. उंचच उंच लाटांमुळे आणि तुफान वारा, मुसळधार पावसामुळे कप्तानाच्या दृष्टिक्षेपात काशाचा खडक आला नसावा. त्यामुळे बोट जाऊन या खडकावर आपटली. निव्वळ दुर्दैवाने त्याच वेळेस एक जोरदार लाट स्टार बोर्डाकडून येऊन आदळली. त्यामुळे बोट कलली. सर्व प्रवासी घाबरून दुसर्या बाजूला पळाले. बाया बापड्यांनी व लेकरांनी आकांत केला. पुरुष मंडळीदेखील भयभित झाली. कॅप्टन शेख व चिफ ऑफिसर आदमभाई हे जीवाच्या आकांताने ओरडून पळू नका, एका बाजूस जाऊ नका म्हणून सर्वांना सांगत होते, पण प्रवाशांनी भयापोटी कोणाचेच ऐकले नाही. दुसरी लाट येण्याच्या मधल्या वेळात बोटीला तोल सावरला नाही व दुसरी लाट ही उतारूंची काळ लाटच ठरली. काय होत आहे हे कळण्याच्या आतच बोट समुद्राच्या तळाशी गेली. रामदास बोटीला जलसमाधी मिळाली. बहुतांशी प्रवासी बोटीबरोबरच तळाशी गेले. जे काही वर येऊन वाचले ते थोडा वेळच टिकले. लाटांचा जोर व समुद्रात पोहून थकल्यामुळे तेही बहुतेक बुडाले.
रेवस येथील कोळ्यांच्या रोजच्या दिनचर्येनुसार ताजी मासळी घेऊन मुंबई येथे काही कोळी बांधव पाच गलबते घेऊन चालले होते. ते काही अंतरावर गेल्यावर त्यांना समुद्रावरील वातावरणात काही फरक जाणवला. वादळाची शक्यता वाटू लागल्याने त्यांनी आपली गलबते वळवून पुन्हा रेवस बंदरात आणली, परंतु तासाभरात आकाश निरभ्र झाले. त्यामुळे ते गलबते घेऊन मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाले. रेवसपासून चार-साडेचार किलोमीटरवर त्यांची गलबते आली असतील, नसतील तोच त्यांना अघटित दृष्य पहावयास मिळाले. समुद्रात अनेक माणसे पोहत असून त्यांच्यामधूनच प्रेते वाहत चालली आहेत असे दिसले. हा काय प्रकार? हे त्यांना कळलेच नाही. ही इतकी माणसे येथे कशी काय याचा ते विचार करू लागले, परंतु ती विचार करण्याची वेळ नव्हती. कोळी बांधवांनी आपली गलबते त्वरित माणसांच्या जवळ नेली व त्यातील जी जीव वाचवण्यासाठी धडपडत होती त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतामध्ये घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी या कोळी बांधवांनी गलबतात असलेली सुमारे दोन हजार रुपयांची मासळी समुद्रात फेकून देऊन माणसांच्या जीवितापुढे मालाची पर्वा केली नाही. काही कोळी बांधवांनी समुद्रात प्राणांची पर्वी न करता उड्या टाकून भराभर माणसांना गलबतावर चढविण्यास मदत केली. सुमारे 75 माणसे गलबतावर घेऊन ती पाचही गलबते रेवस बंदराकडे आली. हे सर्व प्रवासी रामदास बोटीतीलच होते. कॅप्टन शेख व चिफ ऑफिसर आमदभाई हे दोघे वाचले. त्यांनी पोहत आणि गलबतातून रेवस बंदराला येऊन नजीकच्या तार ऑफिसमधून तार केली. एक कोळी बांधव पोहून मुंबई बंदरात पोहचला. त्याने रामदास बोट बुडाल्याची वार्ता दिली, परंतु त्यावर कंपनी ऑफिसरने विश्वास ठेवला नाही. थोड्याच अवधीत दुसर्या मच्छीमार बांधवाने महापालिकेच्या कर्मचार्याचे प्रेत आपल्या गलबतामधून मुंबईला आणले. त्यांनी कंपनी ऑफिसरला वार्ता दिली तेव्हा कुठे बोट बुडाल्याची खात्री पटली. मुंबईला वार्ता पसरल्यामुळे उतारूंच्या नातेवाईकांनी भाऊच्या धक्क्यावर येऊन कंपनी ऑफिसरला घेराव घातला. आमचे लोक कोठे आहेत? त्यांची पे्रते तरी द्या असे ते ओरडू लागले. या रामदास बोटीच्या दुर्घटनेमध्ये आमच्या भुते आणि बामणोली गावातील तीन जण सापडले. हे तोंडलीचे व्यापारी होते. तिघेही कर्ते पुरुष होते. कुटुंबाचे आधारस्तंभ होते. त्यात माझे वडील कै. पांडुरंग पोसू घरत, भुते तसेच कै. नाना म्हात्रे, बामणोली या दोघांना जलसमाधी मिळाली. तिघांपैकी नारायण म्हात्रे हे वाचल्यामुळे जिवंत घरी आले. त्यांच्याकडून डोळ्यादेखत घडलेली रामदास बोटीची कहाणी कळली.
रामदास बोट एकूण 743 प्रवाशांनी खच्चून भरली होती. त्यापैकी बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान व चिफ ऑफिसर आमदभाई यांच्यासह 169 प्रवासी वाचले. बाकी सर्वच बुडाले. बोटीत मुलांसह इतर 30 खलाशी होते. बोटीची लांबी 179 फूट होती. रुंदी 29 फूट, तर उंची तीन मजल्यांची होती. रामजी नावाचा कोळी बांधव व त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे 75 उतारुंना वाचविले. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील भुते या गावचे नारायण सखाराम म्हात्रे, मुळे येथील तुकाराम हिरु घरत, अलिबाग कोळीवाड्यातील बारकू मुकादम हे तर फक्त 14 वर्षांचे होते. ते पोहून आले. मृत्यू पावलेल्या प्रवाशांमध्ये अलिबाग शहरातील प्रकाश जोशी यांचे वडील, सदानंद विरकर यांचे वडील आणि गंभीर शेट होते. हे तिघेही व्यापारी होते तसेच गजानन चव्हाण यांचे वडील या सर्वांना रामदास बोटीने जलसमाधी दिली. रेवदंडा येथील हरी मढवी हे जिवंत घरी आल्यानंतर पुढे जन्मलेल्या त्यांच्या मुलाचे नाव रामदास ठेवले असे समजते. रोहा तालुक्यातील जयराम चोरगे, मुरूड तालुक्यातील मजगावमधील जगन्नाथ गोरखनाथ मुंबईकर, श्रीवर्धनचे केशवराव वैद्य, पेण तालुक्यातील वाशी गावचे मंगलदास पद्मजी पाटील, दिवमधील गोविंद नाईक, बोर्डीचे कृष्णा म्हात्रे, भाल येथील हरिभाऊ म्हात्रे, कोळीवाड्यातील दोन कोळी बांधव आणि मुंबईमधील विश्वनाथ कदम हा मुलगा तर 16 वर्षांचा होता. हे सर्व ज्यांच्या त्यांच्या सुदैवाने वाचले.
अनेक कुटुंब वार्यावर पडली होती. कोण होते त्यांचे अश्रू पुसायला? कोणाला वेळ होता? बोट बुडाल्याच्या तिसर्या दिवसापासून बोटीतील माणसांचे मृतदेह अलिबाग ते मांडव्यापर्यंतच्या समुद्र किनार्यावर लागू लागले. आपापल्या नातेवाईकांचे देह ओळखण्यासाठी लोकांच्या झुंडी जमू लागल्या. ज्यांच्या नातेवाईकांची ओळख पटली त्यांनी ते मृतदेह ताब्यात घेतले, परंतु जे बिनवारस होते ते मृतदेह कुजत पडून राहिले. अलिबागमधील एक माजी नगराध्यक्ष, मानवतेचा करुणाकर आणि कोकण एज्युकेशन सोसायटीमधील समाजसेवेचा वसा घेतलेले हाडाचे माजी शिक्षक कै. वि. ना. टिल्लू हे पुढे सरसावले. त्यांनी पुढाकार घेऊन 20 जणांची एक टीम तयार केली. त्यामध्ये नंतर त्यांच्या या अलौकिक समाजकार्यात अनेकजण स्वखुशीने सहभागी झाले. त्यांनी कुदळ, फावडे घेऊन 110 कुजलेल्या प्रेतांना समुद्र किनार्यावरच मुठमाती दिली.
एकमेकांना मिठ्या मारलेल्या मोठ्या माणसांचे आणि एकमेकांना बिलगलेल्या माय लेकरांचे मृतदेह पुरताना त्यांना काय वाटले असेल याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडतात. कुठे कुजलेल्या मृतदेहाच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्याा काढण्यासाठी बोटे कापून मानवतेला काळिमा फासणारे नराधम आणि कुठे स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कुजलेल्या प्रेतांना मुठमाती देणारे महामानव. अशा या महामानवाला आणि त्याच्या टीमला सलाम! रामदास बोटीच्या दुर्घटनेकडे शिपींग कंपनीने तसेच शासनानेदेखील दुर्लक्ष केले, कारण तो काळ पण तसाच होता स्वातंत्र्य मिळालेले होते. त्याच्या आनंदात स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनेकडे स्वतःचा जम बसविण्याच्या धुंदीत नवीन शासनाने दुर्लक्ष केले. ती वेळच चमत्कारिक होती. इंग्रज आपला झेंडा उतरवून जाण्याच्या घाईत, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा सुवर्णकलश घेण्याच्या गर्दीत.
कोकणातील चाकरमानी आपल्या बायका-मुलांना भेटण्यासाठी या बोटीने जात असत, म्हणून रामदास बोटीला हजबंडस बोट म्हटले जायचे. सन 1936मध्ये बांधलेल्या, 406 टन वजनाच्या 1942मध्ये सरकारने युद्धकार्यासाठी घेतलेल्या रामदास बोटीला आजच्या दिवशी म्हणजे 17 जुलै 1947 रोजी काश्याच्या खडकावर रेवस बंदराजवळ आपटून जलसमाधी मिळाली. इतका कालावधी होऊनदेखील या घटनेचा उल्लेख करताना आम्हा अलिबाग व रायगडवासीयांना अति दुःख होते. बोटीबरोबरच समुद्राच्या तळाशी गेलेल्या व काही वर राहिलेल्या, परंतु थोड्याच वेळ पाण्यावर टिकलेल्या तसेच रामदास बोटीत जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांना भावपूर्ण 76वी श्रद्धांजली!
-श्रीरंग घरत (भुते, ता. अलिबाग)
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …