Breaking News

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल

भाजपने साधला निशाणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असतानाच ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढत आहे. उपलब्धतेपेक्षा मागणी अधिक असल्याने राज्यात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली असून त्याची झळ रुग्णांना बसत आहे. मुंबई उपनगरातील भगवती रुग्णालयात रुग्णांना अपुर्‍या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलवावे लागल्याची घटना घडली आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या तुटवड्याची झळ आता खासगी रुग्णालयांप्रमाणे पालिका रुग्णालयांनाही बसू लागली आहे. बोरीवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. दुर्दैवाने पालिका रुग्णालयातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी सांगितले.

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे गोवंडी येथील शताब्दी, वांद्रे येथील भाभा, कुर्लातील भाभा रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन अभावी दुसर्‍यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन पुरवठ्यातील त्रुटीमुळे महाराष्ट्रात अनेक कोविड रुग्णांना जीव गमवावे लागतात, असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील विविध रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिमेत असलेल्या भाभा रुग्णालयातील 33 रुग्णांना काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. अशीच परिस्थिती बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्येही होती. याठिकाणी 31 रुग्ण होते. मशीनवर ऑक्सिजन संपल्याची नोंद मागील दोन दिवसांपासून येत होती. यासोबतच बोरिवली इथल्या भगवती रुग्णालयातदेखील अशीच परिस्थिती होती.

शुक्रवारी दुपारी 15 आणि रात्री 27 जणांना विविध ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सहा जणांना कंदरपाडा जम्बो सेंटर, 23 जणांना दहिसर कोविड सेंटर आणि 11 जणांना शताब्दी रुग्णालयत पाठवण्यात आलं आहे. अजूनही 49 जण भगवती रुग्णालयात उपचार घेत आहेत. जर ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला तर यांनादेखील हलवण्यात येईल.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply