पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना
पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात गेली दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांची दाणादाण उडवली असून तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेकांच्या घरांचे नुकसान केले त्याचबरोबर शेतीची ही अपरिमित हानी झाली. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे खरोशी कळवे, जोहे, हमरापूर, दुरशेत,कांदळे सोनखार, जिते, दादर,तांबडशेत आदीसह अनेक गावांमध्ये भातशेती व घरांचे नुकसान झाले आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी रविवारी(दि. 23) या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांची विचारपूस केली आणि नुकसानीची पाहणी केली. खरोशी येथे आमदार रविंद्र पाटील यांनी पाहणी केली त्यावेळी घरांमध्ये झालेले नुकसान, शेतीची झालेली अपरिमित हानी त्याचबरोबर अनेकांच्या घरात घुसलेले पाणी या सर्वांची योग्य ती चौकशी करून तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले. दुरशेत गावातील 54 घरंवर दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. गावाशेजारी असलेली वनखात्याची जागा आहे. गावठाण वाढवून तेथे गावाची व्यवस्था कारावी अशी मागणी सरपंच दशरथ गावंड यांनी या वेळी केली. आमदार रविशेठ पाटील यांनी मंडळ अधिकार्यांना तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, खरोशी सरपंच रुपाली महेश घरत, बळवली सरपंच संजय डंगर, उपसरपंच गणेश पाटील, दुरशेत सरपंच दशरथ गावंड, मंडळ अधिकारी सुरेश ठाकूर, आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.