चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे रविवारी (दि. 30) रात्रीपासून अलिबाग शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. अलिबागमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार तीन दिवसांपूर्वी एका खाजगी शिवकवणीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्या वेळी काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले. ही बाब सोशल मीडियाच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी अलिबाग पोलीस ठण्यात काही लोक जमले. त्यांनी शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी ताबडतोब चार तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याची माहिती समजताच मोठ्या प्रमाणावर तरुण अलिबाग येथील महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. अटक केलेल्या मुलांना या पुतळ्याजवळ आणून त्यांना जाहीर माफी मागायला सांगा, अशी मागणी जमलेल्या तरुणांनी केली.
याची माहिती मिळताच आमदार महेंद्र दळवी व माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले. त्यांनी पोलिसांशी तसेच तरुणांशी चर्चा केली. याबाबत रायगड पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितल्यानंतर जमाव पांगला. सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासमवेत चर्चा केली. कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. जे काही होईल ते कायद्यान्वये होईल, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी या वेळी सांगितले.
या घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत. त्यांना कर्जत येथील बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. एकाला अटक करण्यात आली आहे. सध्या आलिबागमध्ये वातावरण शांत आहे, मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून शहराच्या प्रमुख भागांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अलिबागमधील मुस्लीम समाजाने सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून झालेल्या प्रकाराचा निषेध केला व याचा फलकही तेथे लावला. हे करीत असताना मुस्लीम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास आक्षेप घेतला गेला. या प्रकरणात एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे वातावरण तापले व पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी नंतर या तरुणाला सोडले. अखेर वातावरण निवळले.