पनवेल ः वार्ताहर
सध्या कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या नागरिकांना एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. या वेळी सहा वर्षीय हर्षलने माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा न करता आपल्या परिसरात असलेल्या नागरिकांना जेवण देऊन साजरा करा, असे आपल्या घरातील सदस्यांना सांगितले. त्याप्रमाणे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साळुंखे कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा केला. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा मुलगा हर्षलचा सोमवारी (दि. 18) सहावा वाढदिवस होता. या वेळी दरवर्षीप्रमाणे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा न करता परिसरात मोठ्या संख्येने नागरिक हे एक वेळच्या अन्नासाठी बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना अन्नदान करू, अशी कल्पना त्यांना सुचली. त्याप्रमाणे त्यांनी 400च्या वर लोकांना अन्नदान करून वाढदिवस साजरा केला. दरवर्षी हर्षलचा वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यावाटप, गणवेशवाटप, आजारी रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांनी साजरा होत होता, परंतु या वर्षी कोणताही बडेजावपणा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हर्षलचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.