Breaking News

मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

रसायनी ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.16) प्रवेश केला. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण विधानसभा मतदारसंघ प्रमुख अरुणशेठ भगत, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार, वासांबे जि. प. विभागातील भाजपचे सदस्य, माजी उपसभापती देवीदास पाटील, गुळसुंदे जि. प. अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, माजी सरपंच किरण माळी, गोपीनाथ जाधव, संजय खंडागळे, पनवेल मनपा माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, आज खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच नागरिकांच्या हितासाठी काम करीत आहोत. सरकारच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकर्‍यांसाठी विविध योजना आज राबविल्या जात आहेत. आपले सरकार हे अत्यंत संवेदनशिल आहे. नियमांत बसून लोकांसाठी जास्तीत जास्त काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनीही सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी मी, आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करू. आज ज्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते सर्व आज विकासाच्या प्रवाहात सामील झाले आहेत. त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे पक्षात स्वागत करतो.
आमदार महेश बालदी म्हााले की, वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मोहोळपा परिसराचा सर्वांगिण विकास मला करायचा आहे. येथील नागरिकांचे आयुष्य सुकर बनविण्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. तुम्ही आम्हाला कामे सांगा, निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. भाजपमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही.
या वेळी वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागाचे शेकाप विभागीय अध्यक्ष सुभाष आहिर, माजी पंचायत समिती सदस्य अनंता जांभळे, रसायनी फेस्टिव्हलचे प्रमुख संदिप म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य समीर म्हात्रे, प्रल्हाद मुंढे, उमाकांत भोईर, साजन जाधव, उद्धव ठाकरे गटाचे दिलीप कर्णुक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरात अनेक विकासकामे होत आहेत, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मंत्री रवींद्र चव्हाण जरी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत तरीदेखील आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ते आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकच आहेत. कोकणाचा, रायगड जिल्ह्याचा विचार करून ना. चव्हाण साहेब काम करतायेत. आता एकदा तुम्ही भाजपचे कमळ हातात घेतले आहे, त्यामुळे तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप मावळ लोकसभा प्रमुख

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply