Breaking News

ऐक्याचा सावळा गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार वारंवार आपली मोदीविरोधी भूमिका स्पष्ट करून सांगत असले तरी महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. उरलासुरला उद्धव ठाकरे गट आणि सुदैवाने आजवर तुलनेने अखंड राहिलेल्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला वगळून महाविकास आघाडी पुढे न्यायचे मनसुबे रचले आहेत असे बोलले जाते. वस्तुस्थिती तशी नाही असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व सांगत असले तरी आघाडीतील नेतेच अशी काही वक्तव्ये करत आहेत की संभ्रमाचे रूपांतर सावळ्यागोंधळात होऊ लागले आहे.

सत्तेवाचून अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीसारखी झालेली आहे. कोळ्याच्या जाळ्यात आलेल्या मासोळ्या जिवंत राहण्यासाठी तडफड करतात. त्याच वेळेला एखादा मोठा मासा छोट्या माशाला गिळंकृत करण्याचा प्रयत्नही करतो. येथे आपण जेवायला आलो आहोत की जेवण बनायला हेच त्या माशांना कळत नसते. महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते सध्या अशाच मन:स्थितीत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला लालकिल्ल्यावरून ऐतिहासिक भाषण केले, त्यातील एकच वाक्य विरोधीपक्षांच्या कानात सारखे गुंजत राहिले आहे असे दिसते. ‘पुढल्या वर्षी मी पुन्हा येईन आणि माझ्या कामाचा हिशेब देईन’ अशी नि:संदिग्ध ग्वाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील विरोधीपक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले असल्यास त्यात नवल नाही. ‘इंडिया’ नावाचे कडबोळे मतदारांवर किती छाप पाडू शकेल ही शंकाच आहे. कारण या कडबोळ्यातील जवळपास प्रत्येक घटकपक्षाने जनतेचा विश्वास यापूर्वीच गमावला आहे. शिवाय, भ्रष्टाचाराच्या भानगडी त्यांच्यामागे आहेतच. महाराष्ट्रातील चित्र तर अधिकच विदारक आहे. विरोधीपक्षातील कुठला नेता कुठे जात आहे याचा पत्ता त्यांचा त्यांनाच लागत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी जवळपास सगळाच पक्ष सत्ताधार्‍यांच्या गोटात सामील करून घेतला. त्यानंतर अलीकडेच झालेल्या काका-पुतण्याच्या भेटीवरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर आगपाखड केली. पवार यांच्यासारख्या भीष्मपितामहांकडून असे अपेक्षित नाही असे बोलून ते मोकळे झाले. हा लहान तोंडी मोठा घास म्हणायचा का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील संभ्रमात भर घातली. माढा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसाठी नाजूक कोपरा आहे. माढ्यामधून काँग्रेसचाच उमेदवार दिला जाईल असे जाहीर करून चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना केली आहे. यामुळे ज्या एकजुटीचा उदो उदो महाविकास आघाडीचे नेते उठताबसता करत असतात, तिचे बारा वाजले आहेत की काय अशी शंका येते. एकीकडे गतिमानतेने लोकांची कामे करणारे विश्वासार्ह सरकार आणि दुसरीकडे स्वत:च्याच अस्तित्वासाठी झगडणारे संभ्रमित विरोधक यामधून मतदारांनी निवड करायची आहे. ती कुठली असेल हे सांगण्यासाठी कुठल्याही कुडबुड्या ज्योतिषाचीही गरज नाही. उद्धव ठाकरे गट आपली पार रसातळाला गेलेली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या अवस्थेत आहे याचाच अंदाज लागत नाही. काँग्रेस तर पहिल्यापासूनच राज्यातील आघाडीचा एक नगण्य घटकपक्ष होता. विरोधकांच्या एकजुटीसाठी निव्वळ भाषणे करून किंवा टीव्ही कॅमेर्‍यांसमोर वेडीवाकडी वक्तव्ये करून काहीही हाती लागणार नाही. जे राष्ट्रीय पातळीवर चित्र दिसत आहे त्याच्याही पेक्षा अधिक वैचारिक गोंधळ विरोधकांमध्ये महाराष्ट्रात दिसत आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply