रायगडातील आठ आगारांतून 324 एसटी बस फेर्या
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 22 मार्च रोजी टाळेबंदी लागू झाली. तेव्हापासून एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. अखेर शुक्रवार (दि. 22)पासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे दोन महिन्यानंतर लालपरी रस्त्यावर धावली.
दोन महिने एसटी सेवा बंद असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधींचा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून एसटी बसेसच्या रोज 324 फेर्या होणार आहेत. रेड झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून 50 टक्के आसन क्षमतेसह व इतर शर्तींवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत एसटी बसेस धावणार आहेत. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखालील मुले यांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त प्रवासास परवानगी देण्यात आलेली नाही.