Breaking News

भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

आमदार महेश बालदी यांच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्थानिक कामगारांना पगारवाढ आणि भत्ते न देणार्‍या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्रीमहोदयांना अवगत केले असता त्यांनी याची उचित दखल घेतली आहे.
अमेटी युनिव्हर्सिटीतील कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार महेश बालदी यांच्या विनंतीनुसार उच्चतंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात शुक्रवारी (दि. 18) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, सरपंच तानाजी पाटील, भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, अनिल भोईर, स्वप्नील भोईर, तकदीर सते, गोरखनाथ गाताडे, दत्तात्रेय पाटील, नितेश पाटील, प्रकाश भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीत सुमारे 100 स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगार काम करीत आहेत, मात्र गेल्या आठ वर्षांपासून या कामगारांना कोणत्याही प्रकारची पगारवाढ अथवा इतर भत्ते मिळाले नाहीत. याबाबत कामगारांनी अनेकदा व्यवस्थापनास पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या, पण अमेटी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे कामगारांना न्याय देत नाही. कामगारांचे किमान वेतन देण्यास व्यवस्थापन तयार होत नाही. याबाबत आम्ही अनेकदा कामगार आयुक्त कार्यालय, पनवेल यांच्याकडे अमेटी व्यवस्थापनाला बैठकीकरिता बोलविले, पण त्यांचा कोणीही प्रतिनिधी बैठकांना येत नाही. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमेटी युनिव्हर्सिटीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Check Also

सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी …

Leave a Reply