क्लिप व्हायरल होताच महापालिका उपायुक्तांचे कारवाईचे आदेश
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल शहरात पाणीटंचाई असताना सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत बाजूच्या रहिवाशांनी तक्रार करूनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकताच महापालिका उपायुक्तांनी शाळा प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले.
पनवेल शहरात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. जानेवारी महिन्यापासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक पाणी जपून वापरीत असताना पनवेल शहरातील फडके नाट्यगृहासमोर असलेल्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील शौचालयातील सगळे नळ कायम सुरू असतात. त्यातून धो-धो पाणी वाहत असते.
त्या शाळेच्या बाजूला असलेल्या अन्नपूर्णा निवासची आणि शाळेच्या नळाची पाईप लाईन एक असल्याने त्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याबाबत अन्नपूर्णा निवासमधील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. दोन दिवसापूर्वी तेथील रहिवासी गौरी योगेश राजे यांनी त्याचे व्हिडीओ शूटिंग करून कसे पाणी फुकट जात आहे त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण सोशल साईटवर टाकल्यावर महापालिका प्रशासनाला जाग आली.
उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी त्याची दखल घेऊन या शाळेसह महापालिकेच्या इतर शाळांनाही याबाबत काळजी घेण्याचे आदेश दिले.
आमच्याकडे पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने पाणी आल्यावर या शाळेच्या सर्व शौचालायत फिरून तेथील नळ बंद करावे लागतात. याबाबत अनेकवेळा शाळेत तक्रार केली, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर त्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकल्यावर त्याची दाखल महापालिका प्रशासनाने घेतली.
-गौरी राजे, रहिवासी गृहिणी