Breaking News

विरोधकांची कोल्हेकुई

राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मजबूत सरकार दमदार कामगिरी करीत आहे. विकासाच्या योजना, प्रकल्प, निर्णय या सरकारकडून मार्गी लागून सर्वसामान्यांना दिलासा मिळू लागला आहे. शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमातून तर सरकार थेट जनतेपर्यंत पोहचत असून विविध घटकांना निरनिराळ्या प्रकारचे लाभ दिले जात आहेत. हे बघवत नसल्याने विकासाला विरोध असलेले विरोधक सत्ताधार्‍यांच्या नावाने बोंबा मारत आहेत.

राज्यात गेल्या वर्षी सत्तापरिवर्तन होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार अस्तित्वात आले. तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रिय व मनमानी कारभाराला कंटाळून वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे व सहकारी आमदारांनी उठाव केला. ग्रास रूटवर काम करणार्‍या शिंदेंनी सहकार्‍यांना सोबत घेऊन ठाकरेंना शह देत भाजपच्या पाठबळाने नवे सरकार स्थापन केले. भाजप नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार सरकारमध्ये दाखल होऊन उपमुख्यमंत्री झाले. आता तीन पक्षांचे भक्कम सरकार जनतेसाठी कार्यरत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे तिन्ही नेते अनुभवी, अभ्यासू आणि परिश्रम घेणारे असल्याने मागील सरकारच्या काळात रखडलेल्या कामांचा बॅकलॉग भरून काढणे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सरकार पोहचत असून शक्य होईल ते सर्वकाही जनतेला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्य म्हणजे या सरकारला देशातील मोदी सरकारचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत असल्याने विकासाची गाडी सुसाट पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे विरोधक मात्र भरकटू लागले आहेत. क्रियाशील असलेल्या सरकारवर उठसूट टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. मोगलांना जसे संताजी, धनाजी हे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसत असत तसे आता विरोधकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिसत आहेत. त्यांच्यावर वारेमाप टीका आणि एकूणच सरकारवर बेछूट आरोप विरोधी पक्षातील नेतेमंडळी करताना पहावयास मिळत आहे. खरेतर हे त्यांचे अपयश आहे. वास्तविक स्वत:चे सरकार असताना त्यांनी विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, पण इच्छाशक्ती व आपापसात ताळमेळ नसल्याने एकमेकाला सावरण्याखेरिज ते काहीएक करू शकले नाही. कोरोना काळात व त्यानंतरही तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून असत. मग इतरांना त्यांच्यापासून काय प्रेरणा मिळणार? शेवटी व्हायचे तेच झाले. सत्ता गेल्याने आलेल्या नैराश्यातून ही मंडळी आता भोंग्यासारखी बोंबलत आहेत. स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा काही करीत असेल तर त्यावर टीका करायची यातून काय साध्य होणार हे त्यांनाच माहीत, पण जनता सुज्ञ आहे. दोन सरकारमधील फरक त्यांना चांगलाच कळतो. त्यामुळे विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी सरकारला काही फरक पडणार नाही. त्रिशूळ सरकार अधिक जोमाने काम करणार आणि राज्याला विकास व प्रगतीच्या दिशेने नेणार हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळे विरोधकांनी टीका करण्याऐवजी आपण कुठे चुकलो याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे; अन्यथा आता आहे तेवढेही त्यांचे अस्तित्व भविष्यात उरणार नाही.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply