Breaking News

राजिपतर्फे पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा

अलिबाग –  प्रतिनिधी
गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे. यासाठी https://tinyurl.com/ganeshraigad2023 या गुगल लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ गुगल लिंकवर अपलोड करावयाचे आहेत. हे फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत. सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन पाणी व स्वच्छताविषयी जनजागृतीसाठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्स, बॅनर्स, पोस्टरद्वारे जनजागृती करणे, श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी उपक्रम करणे अपेक्षित आहे.
स्पर्धेसाठी तांत्रिक सहाय्य व परीक्षण करण्याकरिता जिल्हा स्तरावरून परीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेचे निकष पूर्ण करणार्‍या व उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या मंडळांना बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी पंचायत समितीमधील गटसमन्वयक यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
केंद्र शासनाने स्वच्छता ही सेवा अभियान सुरू केले आहे. यामध्ये कचरामुक्त भारत हा उद्देश असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply