Breaking News

पनवेल महापालिकेच्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 रॅलीस उदंड प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महापालिका हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेमार्फत प्रगतीशील पनवेल टीम ही इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत सहभागी आहे. यात महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवारी (दि. 17) सकाळी खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेलमध्ये या चारही प्रभागांमध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीला दहा हजारहून अधिक तरुण, नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला.
पनवेलमध्ये महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. या वेळी आयुक्त गणेश देशमुख, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषचे वडील संदीप घोष, उपायुक्त सचिन पवार, डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखा परिक्षक निलेश नलावडे, स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, रनथॉन सायकलिंग क्लबचे सदस्य, सीकेटी महाविद्यालय, याकुब बेग, छोटा खांदा, काळसेकर महाविद्यालय, बांठिया शाळा, सीकेटी इंग्लिश मीडियम शाळेचे विद्यार्थी, गुड मॉर्निग रंग क्लबचे सदस्य उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, प्रत्येक बाबतीत महापालिका आघाडी घेत आहे. आयुक्तांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व टीम वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून दाखवत आहे. प्रगतीशील पनवेल बनण्यामध्ये नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. नागरिकांनी अस्वच्छता करणार्‍यांना रोखल्यास आपला परिसर स्वच्छ राहील व चांगल्या सवयीतूनच पनवेल शहर अधिक अभिमानाने सर्वांच्या समोर जाईल.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, शहरातील सर्व नागरिकांच्या श्रमदानामुळे, योगदानामुळे आज पनवेलचा विकास झाला आहे. या स्वच्छता रॅलीचा उद्देश मनपाचे कर्तव्य आणि नागरिकांनी त्यांची जबाबदारी समजून घेणे आहे. हा संदेश समाजघटकातील प्रत्येकापर्यंत पोहचला पाहिजे.
या रॅलीची सांगता ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वडाळे तलाव येथे झाली. या ठिकाणी सर्व उपस्थितांनी एकत्रितरित्या राष्ट्रगीताचे गायन केले. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वडाळे तलावावर सेल्फी पॉईंटची निर्मिती महापालिकेमार्फत करण्यात आली होती. याचासुद्धा आनंद अनेकांनी घेतला.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply