पनवेल : वार्ताहर
आयपीएलच्या क्रिकेट मॅचेसवर ऑनलाईन बेटिंग लावणार्या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खारघर सेक्टर-10 मधून अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून नागपूर येथून जगदिश मेनलवार याला अटक केली आहे. जगदिश मेनलवार याने आरोपी हरीश गोवर्धनदास चुगनानी व राजीव ओमप्रकाश बोहात या दोघांना आयपीएल मॅचेसवर बेटिंग लावण्यासाठी लिंक दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
खारघर सेक्टर-10 मधील ओमकार एम्पायर इमारतीतील एका फ्लॅटमध्ये काही व्यक्ती लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग लावत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने गत 5 मे रोजी खारघरमधील सदर फ्लॅटवर छापा मारून हरीश गोवर्धनदास चुगनानी (33) व राजीव ओमप्रकाश बोहात (34) या दोघांना अटक केली होती.
या कारवाईत पोलिसांनी 5 मोबाईल फोन, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप आणि काही रोख रक्कम जप्त केली होती. या दोघांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्या दोघांना नागपूर येथील जगदिश मेनलवार याने क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्यासाठी लिंक दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी नागपूर येथून जगदिश मेनलवार याला अटक करून त्याच्याकडून क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण जप्त केले आहे. त्याच्याकडे असलेल्या उपकरणातून त्याने प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे नऊ लोकांना त्यांच्या मोबाईल फोनवर बेटिंग लावण्यासाठी लिंक दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे मेनलवार याने ज्या व्यक्तीकडून क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण व लिंक घेतली, त्याचा व मेनलवार याने ज्या-ज्या व्यक्तींना आपल्या लिंकद्वारे बेटिंग लावण्यासाठी लिंक दिल्या त्यांचा देखील शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही व्यक्ती अटक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.