भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तृत बैठक उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राष्ट्र प्रथम या मूलमंत्राला भारतीय जनता पक्षाने आदर्श मानले आहे. हाच आदर्श भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचा आहे, अशी भावना व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रहितासाठी घेत असलेले महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी तत्पर असले पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
भाजप उत्तर रायगड जिल्ह्याची विस्तृत बैठक शनिवारी (दि. 28) मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अतुलकाळसेकर, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरेे, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विविध विषयांचा आढावा घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.