पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्ण तसेच उपाययोजना या संदर्भात प्रशासनाच्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेट्टी यांनी दिले आहे.
या निवेदनात शेट्टी यांनी म्हटले आहे की, देशात ऑक्टोबरनंतर कोविड-19 या महाभयंकर साथरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असून, दिल्लीत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता पनवेल महापालिका प्रशासनामार्फत कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणती उपाययोजना व तयारी करण्यात आली आहे आणि कशा प्रकारे व किती कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणाच्या नियोजनाबाबत कोणती उपाययोजना केली याची माहिती मिळण्याबाबत आपण बैठक आयोजित करावी व या बैठकीस पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, महिला व बालकल्याण सभापती, विरोधी पक्षनेते, सर्व प्रभाग समिती सभापती यांना उपस्थित राहण्यास आमंत्रित करावे.