सार्वजनिक जीवनात वावरणे सोपे नसते. चित्रपट-क्रीडा या क्षेत्रातील अनेक मंडळी फार सहजपणे राजकारणाकडे वळत असतात. त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय असते, त्यामुळे जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांची मदत होईल या हेतूने राजकीय पक्ष त्यांना सहजपणे सामावून घेतही असतात. पण कैकदा या मंडळींच्या ठायी राजकारण-समाजकारण करताना आवश्यक असणारी प्रगल्भता दिसून येत नाही.
अभिनेता विवेक ओबेरॉयने अखेर ऐश्वर्या राय मिम (व्यंग-छायाचित्र) प्रकरणी माफी मागितली असून आपले संबंधित ट्वीटही त्याने मंगळवारी डीलिट केले. एग्झिट पोलचा संदर्भ असलेले एक मिम विवेकने रविवारी ट्वीट केले होते, ज्यात ऐश्वर्या रायच्या लग्नाआधीच्या प्रियकरांसोबतची दोन छायाचित्रे वापरण्यात आली होती. तिसर्या छायाचित्रात ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चन व मुलगी आराध्यासोबत दिसत होती. सलमान सोबतच्या छायाचित्राला ‘ओपिनियन पोल’, तर विवेक ओबेरॉयसोबतच्या छायाचित्राला ‘एग्झिट पोल’ असे संबोधण्यात आले होते. आणि तिसर्या कौटुंबिक छायाचित्राला ‘निकाल’ म्हटले होते. या मिमवरून विवेकविरोधात ट्विटरवर टीकेची झोड उठली. लोकांची प्रतिक्रिया इतकी तीव्र होती की दिवसाअखेरपर्यंत राष्ट्रीय तसेच राज्य महिला आयोगाने नोटीस बजावून विवेकला या प्रकरणी माफी मागण्याची सूचना केली. प्रथमत: त्याने आपण काहीही चुकीचे केले नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा पवित्रा घेतला, परंतु अखेर उपरती झाल्याने की काय, दुसर्या दिवशी त्याने माफी मागत आपले संबंधित ट्वीट डीलिट केले. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट विनोदी वाटते. परंतु इतरांना तसे वाटत नाही. आपल्यामुळे एक जरी स्त्री दुखावली असेल तर आपण माफी मागतो, असा खुलासा करत त्याने या प्रकरणी माफी मागितली. गेली अनेक वर्षे आपण मुलींच्या कल्याणासाठी काम करत असून महिलांचा अनादर आपल्या हातून कदापिही होणार नाही, अशी पुस्तीही त्याने जोडली. त्याच्या माफीमुळे या प्रकरणावर आता पडदा पडेल. त्याने म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्याचा हेतू निव्वळ या मिममधील विनादाला दाद देण्यापुरताच असेलही. पण हे मिम वादग्रस्त ठरू शकेल हे त्याच्या ध्यानात आधीच का बरे आले नसावे? वास्तवत: या शुक्रवारीच त्याचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदीजींची प्रमुख भूमिका त्याने स्वत: साकारली आहे. परवाच त्याने या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले. या आधी आचारसंहितेमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन वादाच्या भोवर्यात अडकून त्याची परिणती अखेर प्रदर्शन लांबणीवर पडण्यात झाली. येत्या शुक्रवारी अखेर हा चित्रपट प्रदर्शित होत असताना तत्पूर्वी विवेकने हा असा अविवेकीपणा करणे हे निश्चितच अशोभनीय आहे. आपण इतक्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीची, देशातील एका अत्यंत आदरणीय, लोकप्रिय नेत्याची व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे, याचे भान त्याने निश्चितच ठेवायला हवे होते. पण बहुदा त्याला ते जमले नसावे. करिअरमधील कमाईला ओहोटी लागली की ही मंडळी राजकारणाकडे वळतात. अशांची वक्तव्ये, आचरण अनेकदा पक्षाच्या, प्रमुख नेत्यांच्या प्रतिमेला अडचणीत आणणारे ठरते. विवेक ओबेरॉयने राजकारण प्रवेश केलेला नसला तरी तो पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे. अशावेळी त्याला स्वत:वरील जबाबदारीचे भान वास्तव जीवनातही काही प्रमाणात बाळगावेच लागेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper