महायुतीचे मयूर घरत यांची ग्वाही
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर घरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य दिले असून, महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत.
दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह एकूण 11 सदस्यांच्या निवडीसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक होत आहे. दिघोडे येथे भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती समोर काँग्रेस-शेकाप आघाडी अशी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून या थेट सरपंच पदाच्या व सदस्यांच्या निवडणुकीत गावातील नागरिकांना भेडसावणार्या समस्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवित आहोत. गावातील रस्ते, नाले, गटारे, स्वच्छता गृह आणि गरीब गरजू नागरिकांना घरकुल योजनेतून राहण्यासाठी सुसज्ज घरांचा लाभ देणे, व शासनाच्या अख्त्यारीत येणार्या केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्या व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार्या विकास कामांना अग्रक्रमाणे वाव देण्याचा आमचा मानस असल्याचे महायुतीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार मयूर घरत
यांनी सांगितले.