Breaking News

रायगड जिल्ह्यात 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. यामध्ये महाड तालुक्यात सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात 38 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर 564 सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 177 ग्रामपंचयातींमध्ये निवडणूक होईल.
जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाली. महाड तालुक्यातील आठ, म्हसळा सात, माणगाव पाच, तळा आणि पोलादपूर प्रत्येकी चार, श्रीवर्धन तीन, तर पेण आणि सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.
210 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार होती, पण चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे तेथील सरपंचपद रिक्त राहणार आहे, तर 38 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात 168 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
अशाच प्रकारे 210 ग्रामपंचायतींच्या 1854 सदस्यांसाठी निवडणूक होणार होती, पण 44 जागांसाठी उमेदवारी अर्ज आले नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत, तर 564 सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता 1246 सदस्यांसाठी निवडणूक होईल.
जिल्ह्यातील 168 सरपंचपदासाठी 485 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1246 सदस्यपदांसाठी 3395 उमेदवार रिंगणात उरले आहेत. सदस्य व सरपंचपदासाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply