Breaking News

प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणार्‍या जयंत पाटलांनी पक्षनिष्ठा शिकवू नये -खा. सुनील तटकरे

अलिबाग : प्रतिनिधी
नेतृत्व बदल झाला असला तरी मी कालही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि आजही आहे. प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलणार्‍यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना लगावला आहे.
खासदार सुनील तटकरे गुरुवारी (दि. 2) अलिबाग दौर्‍यावर आले होते. त्या वेळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, चारूहास मगर या वेळी उपस्थित होते.
‘माझी राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरू झाली. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मी त्यांच्याबरोबर गेलो. पक्ष नवीन स्थापन केला तरी विचार एकच होता. त्याचप्रमाणे भविष्यातील नेता म्हणून अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून यांच्याबरोबर गेलो आहोत. आम्ही पक्ष बदललेला नाही. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मात्र प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदललेली आहे. त्यांनी कधी शिवसेनेबरोबर युती केली. त्यानंतर त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेबरोबर युती केली. अशा प्रकारे जयंत पाटील यांनी वारंवार आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
2009च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने शिवसेनेशी युती केली. नंतर 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेशी युती तोडली आणि स्वतःचा उमेदवार उभा केला. पुढे 2019च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली आणि आता ते इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत, याकडे सुनील तटकरे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply