रसायनी : प्रतिनिधी
चौक येथील दगडी शाळेत विविध प्रकारचे दाखले वाटप झाले, अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजित केलेल्या शिबिर सफल झाल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले.
विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांना विविध प्रकारच्या दाखल्याची गरज असते, त्यासाठी त्यांना खालापूर तहसील कार्यालयात जावे लागते, त्यामुळे वेळ व पैसा या बाबींचा विचार करता सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असते, याची जाणीव ठेवून खालापूर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष गणेश कदम व मित्रमंडळ यांनी माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले होते. यात जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास, नॉन क्रिमिलेयर दाखला यांचा समावेश होता. विविध प्रकारचे एकूण 610 दाखले झाले, ज्यांची कागदपत्रे कमी होती त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यांना घरपोच दाखले देण्यात येतील, असे आमदार साटम यांनी सांगितले. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार राजश्री जोग, नायब तहसीलदार सूर्यवंशी, शोभा देशमुख, भाजपचे अध्यक्ष बापू घारे, चिटणीस शरद कदम, मंडळ निरीक्षक नितीन परदेशी, महसूल विभागातील कर्मचारी, तलाठी, चौकच्या सरपंच सारिका चौधरी, प्राची आंबवणे, कविता कोंडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी मनाली मुकादम, प्रतीक खंडागळे, चिन्मय चौधरी, प्रशांत नेमाने, अजिंक्य भोईर, कृष्णा मुकादम, संकल्प जोशी, गिरीश जोशी, महेश पोळेकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.