Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे शानदार उद्घाटन

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 8) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले.
या समारंभास अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, अभिनेते भरत सावले, नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सहकार्यवाह स्मिता गांधी, कोषाध्यक्ष अमोल खेर, भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर अध्यक्ष वैभव बुवा, नाट्य परिषद समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव उपस्थित होते.
सांस्कृतिक चळवळीत पनवेल मागे राहू नये यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आली, असे प्रतिपादन नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी केले.
ते पुढे म्हणाले की, अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यश हे कलारसिक आणि स्पर्धक यांच्यामुळे आहे. महाराष्ट्रीय मनामध्ये मराठी नाटक रूजले. पनवेल महापालिका नवीन आहे. राज्यात नाट्यचळवळ उभी राहत असताना या संस्कृतिक चळवळीत पनवेल मागे राहून पोकळी निर्माण होऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामनाथ पुंडेे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ व सहकारी काम करीत असल्याने ही चळवळ योग्य दिशेने जात आहे.
दरम्यान, ठाण्याच्या व्हाईट लाईट संस्थेच्या ’अनोळखी’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीस सुरुवात झाली. यामध्ये प्रमुख भूमिका प्रसाद थोरवे आणि आरती दळवी यांनी साकारली. त्यांना कल्पेश देवकर, अंकिता कालेकर आणि विनिता कर्वे-लाडे यांनी साथ दिली. ‘अनोळखी’ ही एकांकिका कवी सौमित्र यांच्या कवितेवर आधारित आहे. यामध्ये स्त्री प्रेयसी आणि आई ही नाती दाखवताना एका प्रसंगातून दुसर्‍या प्रसंगात जाताना कोठेही विस्कळीत वाटले नाही. ‘मार्सो’च्या कथेतील पात्र भारतात दाखवताना लेखकाने त्यात दाखवलेले पात्र भारतीय भावना जपणारे वाटत असल्याची प्रतिक्रिया कवी, दिग्दर्शक दयाराम निंबोळकर यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिके आहेत, तर यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना रविवारी पारितोषिक वितरण समारंभावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply