Breaking News

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून एमआयडीसीने शनिवारी (दि.9) महसूल विभागाला जागा हस्तांतरण केली. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पिढ्यान् पिढ्या लक्षात राहिल असा कार्यक्रम आज संपन्न होत असून या सर्व कामाचे श्रेय आमदार महेश बालदी यांचे असल्याचे उद्गार काढले, तर आमदार महेश बालदी यांनी एकही आदिवासी बांधव बिनघराचा राहता कामा नये, असे प्रतिपादन करून येत्या पावसाळ्याच्या आत तुमच्या घरांचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे म्हटले.
आपटा ग्रामपंचायत अंतर्गत माडभुवन आदिवासी वाडीलगत असलेल्या डोंगराला पावसाळ्यात मोठ्या भेगा पडल्या होत्या. इर्शाळवाडीची पुनरावृत्ती माडभुवनवाडीत होऊ नये याची गांभीर्याने दखल घेत आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अतिवृष्टीच्या काळात या सर्व ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते. या दरडीचा धोका लक्षात घेऊन भविष्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून योग्य पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी शासन व प्रशासनाकडे केली. वाडीचे ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या सहमतीने पाताळगंगा एमआयडीसीमध्ये सारसई बागेचीवाडीजवळ पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले. मंत्री सामंत यांनी या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊन माडभुवनमधील 97 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी 300 गुंठे जागा एमआयडीसीने शनिवारी महसूल विभागाला हस्तांतरित केली.
जागा हस्तांतरण कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रांत अधिकारी राहुल मुंडके, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. संतोष थिटे, तहसीलदार विजय पाटील, भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच विद्याधर मोकल, मंगेश वाकडीकर, राजू पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी, माजी सरपंच शनिवार उघडा, युवा मोर्चाचे सदस्य दिनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, ज्ञानेश्वर भोईर, उमेश पाटील, राजेंद्र पाटील, युवा मोर्चा केळवणे पं.स. विभागीय उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, असद पिट्टू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अतिशय महत्त्वाचा असतो. यासाठी लवकरच कॅम्पचे आयोजन केले जाईल तसेच घेरावाडीला मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी विभागीय स्तरावर आमदारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
या वेळी माडभुवन येथील तरुण केशव निरगुडा याने दोन्ही आमदारांचे वाडीच्या वतीने आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे आणि सर्व महिला-पुरुष ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply