Breaking News

गाढी नदीच्या ब्रीजलगत रस्ता द्या

देवद गामस्थांची सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल ते देवद या गाढी नदीवर होत असलेल्या ब्रीजला देवद गावाच्या बाजूने वाहन योग्य रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांनी सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. या रस्त्यासाठी ब्रीज परिसरात देवद ग्रामस्थांनी सिडको अधिकार्‍यांसह पाहणी केली.
पत्रात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षे आम्हा देवदवासीयांसाठी गाढी नदी पार करून पनवेल शहराकडे जाण्यासाठी पूल नाही. ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’ यांनी उभारलेल्या पाईपलाईनच्या सर्व्हिस पूलावरून आम्ही ये-जा करत आहोत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे तसेच सिडको आस्थापनाकडून देवद गावासाठी गाढी नदीवर ब्रीज बांधण्यात येत आहे. त्याचे कामही वेगाने सुरू आहे. ब्रीजचे काम मार्च – एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे आम्हाला कळले आहे, परंतु ब्रीज तयार झाला तरीही देवद गावात ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. ब्रीजच्या कामासोबतच वाहतुकीच्या दृष्टीने देवद येथील ग्रामस्थांसाठी तातडीने देवद गावाच्या बाजूने योग्य रस्ता करून देण्यात यावा. पूल तयार होईल व रस्ता नाही अशी परिस्थिती ओढवू नये अशी आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. या रस्त्याचे काम लगेच सुरू व्हावे अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, या रस्त्यांच्या जागेसाठी सिडकोचे अधिकारी गोसावी, सिडकोचे इंजिनीअर रायकर, माजी जि. प. सदस्य व भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, देवद गावचे सरपंच विनोद वाघमारे, उपसरपंच विजय वाघमारे, सनातन आश्रमचे प्रमुख अभयजी वर्तक, ग्रामपंचायत सदस्य दिनेश वाघमारे, संदीप वाघमारे, राम वाघमारे, संजय वाघमारे, बंटी रसाल, सनातन आश्रम घाडगील, ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्टर आणि देवद येथील ग्रामस्थ अशा सर्वांनी मिळून सदर जागेची पाहणी केली. हा रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे असे सर्वानुमते ठरले. आपण या कामी तातडीने लक्ष घालावे आणि रस्ता लवकरात लवकर बनवून देण्यात यावा, अशी मागणी सिडकोच्या अधिकारी गोसावी यांच्याकडे करण्यात आली.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply