कचरामुक्त शहरांमध्ये थ्री स्टार दर्जा प्राप्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये पनवेल महापालिकेस केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले वॉटर प्लस शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) थ्री स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाला आहे.
देशातील चार हजारपेक्षा जास्त शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये सहभाग घेतला होता. देशातील 58 शहरांना या वर्षी वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले असून यात महाराष्ट्रातील 18 शहरांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात वॉटर प्लस मानांकन सर्वप्रथम पनवेल महापालिकेस मिळाले आहे. याचबरोबर जीएफसी रेटिंग अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये या महापालिकेने मागील वर्षीप्रमाणे आपला थ्री स्टार रेटिंगचा दर्जा टिकवून ठेवला आहे. यात योगदान दिल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
महापालिकेने वारंवार कचरा वर्गीकरणाबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांमधून प्राधान्याने महिला वर्गामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) थ्री स्टार दर्जा पनवेल महापालिकेने टिकवून ठेवला आहे. यापुढेही नागरिकांनी अशाच प्रकारे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.