पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड कॉलेज (सीकेटी) या स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.17) करण्यात आले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून (2024-25) संपूर्ण राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यांतर्गत येणार्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य व उपप्राचार्य, जिल्ह्यांतर्गत येणार्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासाठी ही कार्यशाळा मार्गदर्शनक ठरली.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता (डीन) डॉ. कविता लघाटे, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. किशोरी भगत, कोकण विभागाचे उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, मुंबई विद्यापीठातील विविध विभागांचे अधिष्ठाते, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव डॉ.एस.टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. पाटील उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांचा सत्कार केला.
संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील यांनी अतिथींचे स्वागत केले. प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी जिल्ह्यांतर्गत येणार्या वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत अत्यंत सोप्या भाषेत उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात जिल्ह्यांतर्गत येणार्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बारावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यास सांगण्यात आले. याचबरोबर कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थितांच्या सर्व शंकाचे निरसन केले.
प्रा.डॉ. कविता लघाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सीकेटी महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे यांनी महाविद्यालाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आलेला अनुभव सांगितला.
या कार्यशाळेत मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यालयांतील मुख्याध्यापक आणि शिक्षक इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.आर.व्ही. येवले यांनी व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यशाळा यशस्वीरित्या केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …