Breaking News

अवघे विश्व राममय!

मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत त्यांच्या जन्मस्थळी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराची निर्मिती केली जाते आहे. जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारीला श्री रामप्रभू पुन्हा आपल्या जन्मस्थळाच्या गर्भगृहात विराजमान होतील. निश्चितपणे भारताच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून देशभरातीलच काय तर जगभरात पसरलेले भारतीय वंशाचे लोक तसेच अन्य देशांतील रामभक्तही या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कित्येक पिढ्यांच्या अविरत संघर्ष आणि न्यायालयीन लढाईनंतर हा सुवर्णक्षण आला आहे.

अयोध्येमध्ये भव्य असे श्री राम मंदिर साकारताना पाहणारी आजची पिढी खरोखरच भाग्यवान म्हणायला हवी. देशाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक शहरात, गावात आज श्रीरामाच्या आगमनाचा उत्साह, आनंद दिसतो आहे. जो-तो आपापल्या क्षमतेनुसार या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतो आहे. अनेक ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात रामलल्लाच्या पूजेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून काही गावांतील राम मंदिरांमध्ये विशेष भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. रस्तोरस्ती श्री रामाची छबी असलेले झेंडे, चित्रे, प्रतिमा असलेल्या माळा आदी गोष्टींची रेलचेल दिसते आहे. काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन मंदिरांमध्ये स्वच्छतेचे कार्यक्रमही राबवले जात आहेत. समाजमाध्यमांवरही श्री रामाच्या गाण्यांना लोकांची वाढती पसंती दिसते आहे. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने हे सारे अत्यंत आनंदी व जोशपूर्ण असा माहौल निर्माण करणारेच आहे. शिवाय त्यासोबतच आपण श्री रामाच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आत्मविकास साधणेही आवश्यक आहे. श्री राम हे साक्षात धर्माचे स्वरूप आहेत म्हणूनच भारतीयांच्या मनात श्री रामाला स्थान आहे. प्रभू रामचंद्रांच्या जीवनगाथेत ठायीठायी आदर्श व्यवहाराचे प्रतिबिंब दिसते. बहुतांश भारतीय लहानपणापासून ही जीवनगाथा ऐकत, वाचतच मोठे होतात. गेल्या दोन-तीन पिढ्यांना रामायण या मालिकेतूनही याचे दर्शन घडले आहे. निव्वळ भारतीय भाषांमध्येच नव्हे; तर आशिया खंडातील इतरही अनेक देशांमधील भाषांमध्ये रामकथा विस्ताराने सांगितलेली आढळते. चीनपासून तुर्कस्तानपर्यंतच्या अनेक देशांचा यात समावेश आहे. त्यामुळेच या देशांसह जगभरातच 22 जानेवारीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे. अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरमध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पहायला मिळणार आहे हे एव्हाना सर्वांनाच ठाऊक आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 21 तारखेला राम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात युरोपभरातील हजारो लोक भाग घेणार आहेत. उत्तर अमेरिका व कॅनडामध्ये अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा तसेच दीपोत्सवाचे कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत. अयोध्येतील कार्यक्रमाकरिता जगभरातून अनेक विदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास 50 देशांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. इंडोनेशिया, सौदी अरबस्तान या मुस्लिमबहुल देशांमध्येही प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. आजच्या घडीला जगभरातील 160 देशांमध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे. अशा सर्व देशांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत श्री रामप्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणे हा भारतीय अस्मितेचा हुंकार आहे. म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिक तसेच जगभरातील भारतीय अगदी मनापासून या सोहळ्याशी जोडले गेले आहेत व ‘याचि देही, याचि डोळा’ हा सोहळा किमान टीव्हीवर पाहण्यासाठी आतुरले आहेत. सोमवारच्या दिवशी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची, तर राज्य सरकारने संपूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे लोकांना मनोभावे हा ऐतिहासिक क्षण अनुभवणे, आनंदाने साजरा करणे शक्य होणार आहे.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply