पोलादपूर : प्रतिनिधी
सहलीसाठी आलेल्या 28 शाळकरी विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुक्यात अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर बुधवारी (दि.31) दुपारी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून सोडून दिल्यावर सहल पुढे मार्गस्थ झाली.
नाशिकमधील भोंसला मिलिटरी स्कूलची तीन दिवसीय सहल रायगड जिल्ह्यात आली होती. या सहलीमध्ये 103 विद्यार्थी होते. ते प्रतापगड पाहण्यासाठी जाणार होते. तिसर्या दिवशी पोलादपूरमध्ये या सहलीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मुक्काम होता. पोलादपूर येथे आल्यानंतर प्रतापगडला जाण्यापूर्वी सर्व जण विश्रांतीसाठी थांबले असता यातील तीन ते चार विद्यार्थ्यांना रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पहाटेनंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. 24 मुलांनाही पोटदुखीचा त्रास होऊ लागण्याने त्यांनादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सद्यस्थितीत सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास त्यांना होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विषबाधा कोणत्या अन्नपदार्थांमुळे झाली? या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? याची सखोल चौकशी करण्याची मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …