पनवेल : वार्ताहर
विद्यार्थ्यांसह युवा पिढीचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात युवा मोर्चाचे काम करताना लाखो किलोमीटरचा प्रवास राज्यभरात मी केला. युवक-युवतींशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांचे अनेक प्रश्न समजून घेतले. राज्य सरकारने या बाबतीत संवेदनशील विचार असणे अपेक्षित आहे, मात्र तो महाविकास आघाडी सरकारमध्ये नसल्याने युवकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि खदखद आहे, असे प्रतिपादन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. दै. मराठवाडा साथी, झक्कास मराठी आणि राजस्थानी मल्टीस्टेटच्या फेसबुक पेजवरून थेट संवाद साधताना ते बोलत होते.
राज्यातील लोकांच्या खूप अपेक्षा राज्य सरकारकडून असताना सतत लोकांचा भ्रमनिरासच होतो आहे. लोककामांना प्राधान्य देण्यापेक्षा स्वत:च्या तुंड्या भरण्यासाठी चाललेली रस्सीखेच दिसून येते. धोक्याने सत्तेत आलेले हे सरकार आहे. अनेक प्रश्नांवर या सरकारला सपशेल अपयश आलेले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात अत्यंत असंतोष आणि चीड या सरकारद्दल निर्माण झालेली आहे असे सांगून पाटील म्हणाले की, आज कोरोनाची स्थिती भयानक आहे. रुग्णांची बिले लाखात होतात, बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनची व्यवस्था मूबलक प्रमाणात नाही, फार मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यभरातील महिलांवर होणार्या अत्याचारांतही वाढ झालेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न राज्यात निर्माण झालेला असताना मुख्यमंत्र्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. लाखो लोकांच्या भावना श्रद्धा मंदिरांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मदिरालये उघडली जातात, तर मंदिरे का बंद ठेवली जात आहेत, असा सवालही त्यांनी या वेळी केला.