Breaking News

महाडनजीक खासगी प्रवासी बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

महाड : प्रतिनिधी
महाडनजीक एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. बर्निंग बसचा थरार महामार्गावरील प्रवाशांना पहावयास मिळाला. सुदैवाने या आगीत कोणीच जखमी झाले नाही.
रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीची गौरव चव्हाण यांच्या मालकीची प्रवासी बस (एमएच 08 ए 9779) मंगळवारी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. मध्यरात्री 2.30 वा. चे दरम्यान महाडच्या सावित्री पुलाजवळ बसच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून टायरने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना खाली उतरवले तसेच बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र तोपर्यंत बसने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या बसमध्ये चालकासह एकूण 22 जण प्रवास करीत होते. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून सुखरूपरित्या मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply