Breaking News

इनकमिंगचा ओघ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्र वेगाने बदलताना दिसते आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाबरहुकुम राज्याचा कारभार चालू ठेवण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने ही स्वागतार्ह बाब आहेच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे इतर पक्षांमधून महायुतीकडे ‘इनकमिंग’चा ओघ आतापासूनच सुरू झाल्याचे दिसायला लागले आहे.

एखादा न्यायालयीन निर्णय स्वत:ला हवा तसा लागला तर तो सत्याचा विजय, आणि विरोधात गेला की सत्ताधार्‍यांचे कारस्थान, अशी ओरड करण्याची सवयच विरोधीपक्षांना लागली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ईव्हीएमपर्यंत सर्वच बाबतीत अशी ओरड अनेकदा दिसली आहे. किंबहुना मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांनी सातत्याने नकारात्मक राजकारणच केले आहे, मात्र त्याचा परिणाम त्याच पक्षांना भोगावा लागतो आहे. इतक्या निवडणुकांमध्ये पराभवाचे चटके बसल्यानंतरही विरोधीपक्ष काहीच धडा शिकले नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करता करता विरोधीपक्षाचे अनेक नेते राष्ट्रहिताच्या विरोधात भूमिका घेऊ लागले ही निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. जे राष्ट्रीय पातळीवर घडले तेच कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्रातही घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षचिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला. तो तसा अपेक्षितच होता. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली की शिवसेनेप्रमाणेच केवळ नेतृत्वात बदल झाला याबाबतचा कायदेशीर कीस येत्या काळात सर्वोच्च न्यायालयात पाडला जाईल कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उर्वरित राष्ट्रवादी काँग्रसचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यासंदर्भात आपली बाजू ऐकल्याशिवाय निवाडा केला जाऊ नये अशा आशयाचे ‘कॅव्हेट’ अजित पवार गटाने दाखल केले आहे. पंतप्रधान मोदी यांची धोरणे अथवा निर्णय सर्वसामान्य जनतेला मान्य आहेत याचे प्रत्यंतर एकदा नव्हे दोनदा आले. त्यांचे नेतृत्व मान्य करून महायुतीत सामील होण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरेल असा विचार करून काही मोठे नेते महायुतीकडे वाटचाल करू लागले आहेत. काँग्रेसचे मुंबईतील तडफदार नेते मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत उजळमाथ्याने प्रवेश केला. तसेच गुरुवारी काँग्रेसच्या बाबा सिद्दिकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा आहे. बाबा सिद्दीकी हे गेली 48 वर्षे मुंबई काँग्रेसमध्ये कार्यरत होते हे येथे ध्यानात घ्यायला हवे. देवरा किंवा सिद्दीकी यांच्यासारख्या जाणत्या आणि अनुभवी नेत्यांना काँग्रेसची साथ सोडाविशी का वाटते, याचे आत्मपरीक्षण काँग्रेसनेच करायला हवे. नकारात्मक राजकारण अंतिमत: स्वत:च्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणारी कृती ठरते. ठाकरे गटाचे नेते अजुनही मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या नावाने छाती पिटून घेत आहेत. महाराष्ट्रासाठी आपण काय केले हे सांगण्याऐवजी सत्ताधारी पक्षांना शिव्यांची लाखोली वाहण्यात धन्यता मानत आहेत. या सार्‍या प्रकारांना जनता कंटाळली आहे. हे असेच चालू राहिले तर येत्या महिन्याभरात महायुतीतील ‘इनकमिंग’चा ओघ लोंढ्यामध्ये रूपांतरित होईल यात शंका नाही.

 

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply