Breaking News

पनवेल महापालिकेची शिवजयंती नियोजन बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने लोकसहभागातून महापालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि. 8) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली.
या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, महापालिका उपायुक्त गणेश शेटे, कैलास गावडे, डॉ.वैभव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक रमेश जाधव, वाहतूक निरीक्षक संजय पाटील, माजी नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी, विविध जयंती मंडळांचे, शाळांचे, शासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. या वेळी लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांची स्पर्धा होणार आहे. या मिरवणुकीमध्ये विविध शाळांनी, संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले असून आपल्या सहभागाची पूर्व नोंदणी महापालिकेकडे करणे गरजेचे असल्याचे उपायुक्त कैलास गावडे यांनी या वेळी सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी शिवजयंतीच्या भव्य मिरवणुकीस सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात सहकार्य करावे, असे आवाहन केले, तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वच्छता, सुरक्षा व विद्युत विभागास या दिवशी चोख व्यवस्था ठेवण्याबाबत सूचित केले.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात होईल. हुतात्मा स्मारक चौक, आदर्श लॉज, गावदेवी मंदिर, सावरकर चौक, मनपा मुख्यालय, सेवा योजन कार्यालय, मौलाना आझाद चौकमार्गे मिरवणुकीचा शेवट टपाल नाक्यावरील शिवरायांच्या अर्धाकृती पुतळा चौकामध्ये होईल. या ठिकाणी मिरवणुकीत सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवजयंती उत्सवाचा खर्च लोकसहभागातून व प्रायोजकांमार्फत केला जाणार आहे. नागरिकांनी वर्गणी देण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply