Breaking News

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रथम

मंगळवारी मुंबईत होणार बक्षिस वितरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानुसार या विद्यालयाला 21 लाख रुपये पारितोषिक देऊन मंगळवारी (दि. 5) मुंबईत होणार्‍या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील 103312 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने सतत उज्वल यशाची परंपरा असलेल्या आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नवी मुंबईतील प्रतिष्ठित रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभाग घेतला होता. सर्वांगीण शिक्षण विकास, अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असलेल्या या विद्यालयाने पुन्हा एकदा उल्लेखनीय जबाबदारी यशस्वीरित्या झाली. त्यानुसार या विद्यालयाने मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबईतील एनसीपीए हॉल येथे होणार्‍या बक्षिस वितरण समारंभात पारितोषिक स्विकारण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी व शाळेचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात या विद्यालयाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला होता. आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा रायगड व नवी मुंबईला शिक्षण क्षेत्रात उच्चस्थानी नेण्यासाठी दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply