आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण येथे 100 खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेल्या 15हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. या कामासाठी एकूण 82.54 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शासनाने त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
उद्योग, वाहतूक, आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उरणमध्ये सर्वसुविधांयुक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याची मागणी कार्यक्षम आमदार महेश बालदी यांनी सरकार दरबारी केली होती. उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी 2018 साली फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मान्यता मिळाली होती, मात्र राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर सन 2022पर्यंत या कामाला मुहूर्त लागला नाही आणि हा प्रश्न प्रलंबितच राहिला होता, परंतु आमदार महेश बालदी यांनी आपले प्रयत्न कायम ठेवले. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकार्यांसोबत बैठकही घेतल्या आणि हा प्रश्न सुटण्याला वेग आला.
या अनुषंगाने आता उपजिल्हा रुग्णालय व वसतिगृह बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार्या 84.54 कोटी निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार अद्ययावत असे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लवकरच साकारणार असून त्याचा रुग्णांना फायदा होणार असून उरणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.