अलिबाग (प्रतिनिधी):
मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले पाहीजे, वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीचा विचार करा आणि तयारीला लागा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले. अलिबाग येथे गुरुवारी (दिं. ११) आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय मेळाव्यात आमदार आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. खासदार सुनिल तटकरे, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, आमदार रमेश पाटील, ऍड. महेश मोहीते, दिलीप भोईर, राजा केणी, अमित नाईक यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गीतेना लोकसभेचे काम करण्याची बराच काळ संधी मिळाली. पण या संधीचा त्यांनी मतदारसंघासाठी काय फायदा करून दिला, याचे गणित मांडायला बसलो तर आपल्या पदरी काही पडू शकणार नाही. या मतदारसंघासाठी काय केले हे मांडायला सांगितले तर ते काही सांगू शकणार नाही. या उलट जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतांना सुनील तटकरे यांनी केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अलिबागचे मेडीकल कॉलेज असो अथवा म्हसळ्याचे युनानी कॉलेज यांच्या मंजूरीसाठी सुनील तटकरे यांचे प्रयत्न कोणी नाकारू शकणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. गेल्या पाच वर्षात भरभरून निधी रायगड मध्ये आलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या विवीध योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सुनील तटकरे यांनाही निवडणून देणे आपले कर्तव्य आहे. प्रचारासाठी महिनाही उरलेला नाही, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचून प्रचार करणे गरजेचे आहे. नरेंद्र मोदी सांगतात प्रत्येक बुधवर जिंकायचे आहे, वैयक्तीक भूमिका बाजूला ठेऊन कामाला लागा असा सल्ला आमदार ठाकूर यांनी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.
देशाने जवाहरलाल नेहरू आणि इंदीरा गांधी यांच्या काळात स्थीर सरकारे पाहीली. नंतरचा काळ अस्थिरतेचा होता. या अस्थिरतेचा विकासावर परिणाम झाला. ही अस्थीरता नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात दूर झाली. त्यामुळे देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली. या स्थीरतेसाठीच भिन्न विचारसरणीचे पक्ष एनडीएच्या माध्यमातून एकत्र आले. यामागे राष्ट्रहीत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाठी पुन्हा एकदा स्थीर सरकारची आवश्यकता आहे. हे स्थीर सरकार नरेंद्र मोदींच देऊ शकातात त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे हात बळकट करायला हवेत .देशाच्या विकासाठी राजकीय स्थीरता महत्वाची असते, कारण ज्या वेळेस देशात अस्थीर सरकार असते, तेव्हा विकासाला खीळ बसतो, असे खासदर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
कालबाह्य झालेले कायदे बदलले जातात, तो कायद्यातील बदल असतो. राज्यघटनेतील नाही. त्यामुळे निवडणूका आल्या काही घटक सविंधान बचावचा नारा देतात. पण कायदे आणि राज्यघटना यातील फरक समजून घेणे गरजेचे असते. राजकारणात संक्रमणे होत असतात. ही संक्रमणे कार्यकर्त्यांनी समजून घेणे आवश्यक असते. उद्याचा विचार करून पुढे जायचे असते. काल पर्यंत परस्पर विरोधात लढलो. पण आता एकत्रित पुढे जायचे आहे. त्यासाठी गावपातळीपासून मतभेद मिटतील यासाठी प्रयत्न करू असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले. तर कार्यकर्त्यांनी मतभेद, मनभेद बाजूला ठेऊन कामाला लागावे, पाच वर्षात अनेक घडामोडी झाल्या. पण आता झाले गेले विसरून कामाला लागूयात असे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी केले.