युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगारक्षम बनण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
लायन्स क्लब ऑफ पनवेल, यशस्वी अॅकडमी फॉर स्किल्स, पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिटूशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट रायगड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील पिल्लई इन्स्टिट्युटमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम सोमवारी (दि. 15) उत्साहात साजरा झाला.
केंद्र सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच अँप्रेन्टिस योजनेच्या माध्यमातून युवावर्गाला उपलब्ध करून दिलेल्या ऑन द जॉब ट्रेनिंगच्या सुविधेचा युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यायला हवा, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. या वेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या विद्यार्थ्यांना आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
सन्माननीय पाहुणे लायन्स क्लबचे प्रथम प्रांतपाल संजीव सूर्यवंशी आणि द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांनी तसेच प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते व ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापनतज्ज्ञ जे.बी. काबरा आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काबरा व नागरे यांच्या हस्ते अँप्रेन्टिस योजनेतून ऑन द जॉब ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी प्राप्त झालेल्या युवक युवतींना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एस.जी. चव्हाण यांनी कौशल्य दिन साजरा करण्यामागचे महत्त्व सांगितले तसेच पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पनवेलचे रीजन चेअरपर्सन सुयोग पेंडसे, जीएलटी कोऑर्डिनेटर ज्योती देशमाने, नागेश देशमाने, हेमंत ठाकूर, खजिनदार मनोज म्हात्रे, प्रमोद गजहंस, अलका चव्हाण, शोभा गिल्डा, लायन्स क्लब ऑफ वाशीचे अनुभव जैन, डिस्ट्रिकचे जीएसटी कोऑर्डिनेटर विजय गणत्रा, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यशस्वी अॅकडमी फॉर स्किल्सच्या कॉपोरेट कम्युनिकेशनचे योगेश रांगणेकर, पिल्लई कॉलेजचे डॉ. प्रशांत लोखंडे, निवेदिता मॅडम, प्रा. नितीनकुमार मोरे यांच्यासह पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे मिलिंद सूर्यवंशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अशोक गिल्डा यांनी मानले.