लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी सोहळा आणि वृक्षदिंडीचे आयोजन मंगळवारी (दि. 16) करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईसह पारंपारिक वेशभूषा तसेच विठ्ठलनामाच्या केलेल्या गजरामुळे विद्यासंकुलात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सर्वप्रथम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांच्या हस्ते दिंडीच्या पालखीचे, पालखी-पूजन, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. एस.टी गडदे, विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षक अजित सोनावणे, कैलास म्हात्रे, वैशाली पारधी, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी विद्यालयाच्या संगीत शिक्षिका अर्चना पाटील आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभंग सादर केले. मुलांनी गोल रिंगण घालून विठूनामाचा गजर केला. वृक्षारोपण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत भक्तीरस अनुभवला.