आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 97 आदिवासी कुटुंबांना प्लॉटचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आपटा सारसई येथील दरडग्रस्त माडभुवनवाडीतील ग्रामस्थांचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाताळगंगा एमआयडीसीच्या जागेत पुनर्वसन करण्यास शासनाने मंजुरी दिली असून 300 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दरडग्रस्त वाडीतील 97 कुटुंबांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.3) प्लॉटच्या सनदचे वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा सारसई येथे माडभुवन ही आदिवासीवाडी आहे. गेल्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी डोंगराला मोठ्या भेगा पडल्याचे आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. इर्शाळवाडीचे दुःख प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आमदार महेश बालदी यांनी याची पुनरावृत्ती माडभुवनवाडीत होऊ नये यासाठी गांभीर्याने शासन, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश आले आणि पाताळगंगा परिसरात एमआयडीसीच्या जागेत वाडीचे पुनर्वसन करण्याची मंजुरी शासनाने दिली. त्यासाठी शासनाने 300 गुंठे जागा एमआयडीसीकडून उपलब्ध करून दिली आहे.
माडभुवनवाडीतील 97 कुटुंबांना शनिवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते प्लॉटच्या सनदचे वाटप करण्यात आले. लवकरच या जागेवर शासनाकडून पुनर्वसन करण्यात येईल, असे मत या वेळी आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय टेंबे, सरपंच निकिता भोईर, उपसरपंच मयूर शेलार, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोईर, सदस्य असद पिट्टू, मारूती चव्हाण, राजेश देशमुख, पांडुरंग लेंडे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत आणि मोठ्या संख्येने वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.