सोहळे लांबणीवर टाकण्याचा नाइलाज
पनवेल : वार्ताहर
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा फटका यंदाच्या लग्नसराई हंगामालाही बसला आहे. दणक्यात बार उडवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्यांना यापूर्वी ठरलेले मुहूर्त रद्द करून अनिश्चित काळासाठी लग्नसोहळे लांबणीवर टाकण्याचा पर्याय नाईलाजाने निवडावा लागला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोविड परिस्थिती सुरू आहे. मधला काळ वगळता कोरोनाने आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. एक मे पर्यंत टाळेबंदी घोषित केली. या वातावरणाचा फटका सर्वांनाच बसला असून लग्नसराईचा हंगाम त्यातून सुटलेला नाही.
कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या लग्नसराई हंगामाचे नुकसान झाले. यंदा गतवर्षीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. मार्चपासून सुरू होणारे लग्नसोहळे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस चालतात. यंदा मुलाचे घरातील कार्य उरकायचे म्हणून काही महिन्यापूर्वीच तारखा आरक्षित करून ठेवलेल्या कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. प्रत्यक्षात, वेळ जवळ तेव्हा कोरोनामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. सध्याच्या वातावरणात मनासारखा लग्न सोहळा होणे अवघड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी ते लांबणीवरच टाकण्याचा मार्ग स्वीकारला.
लग्नासाठी यापूर्वी 50 जणांची उपस्थिती बंधनकारक होती. आता ती 25 आहे. दोन्हीकडील जवळचे नातेवाईक, मित्र परिवाराला विवाहासाठी आमंत्रित करणे अनिवार्य आहे. त्यामुळे अत्यल्प मर्यादेत लग्नसोहळे घेता येत नाहीत. मोठ्या घराण्यांमध्ये हजारोंची उपस्थिती लौकिकाचा भाग मानला जातो. कोणत्याही प्रकारची होस मौज, भव्य-दिव्य काही करता येणार नाही. त्यापेक्षा ते लांबणीवर टाकण्याचा निर्णय बहुतांश कुटुंबांनी घेतला आहे. नाइलाज असणार्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या उपस्थितीत लग्न उरकून घेण्याची मानसिकता ठेवली आहे.
लग्नासाठी पूर्वी आरक्षित केलेल्या तारखा अनेक कुटुंबीयांनी रह केल्या आहेत. एप्रिल, मे महिन्यातील हंगामात आमच्याकडे लग्नसोहळयाचे नियोजनासाठी येतात. यंदा बोटावर मोजता येईल ऐवढेच सोहळे होत आहेत. जेमतेम 25 जणांच्या उपस्थितीत लग्नाचा खर्च करण्यापेक्षा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मनासारखा सोहळा करण्याचा कुटुंबीयांचा विचार आहे.
-मेघना कदम, संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट