प्रत्येक ठिकाणाची एक ओळख असते. त्यावरून ते ठिकाण ओळखले जाते. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची तलावांचे शहर अशी पूर्वापार ओळख राहिली आहे. याच पनवेलचे एक घट्ट समीकरण बनलंय ते म्हणजे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर. त्यांनी येथील जनतेसाठी स्वतःला वाहून घेतले असून आपल्या उत्तुंग कार्याने पनवेल परिसराचे रूपडे पालटले आहे.
मुळातच आमदार प्रशांत ठाकूर यांचे घराणे समाजसेवेचे व्रत अंगीकारलेले. त्यांचे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर हे गरीब, गरजूंसाठी मसिहा मानले जातात. या लोकनेत्याचे दातृत्व अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे, तर आजोबा जनार्दन भगत हे कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व समाजसुधारक होते. अशा प्रकारे सामाजिक कार्याचे बाळकडू आमदार प्रशांत ठाकूर यांना घरातूनच मिळाले. विचारांची बैठक आणि ध्येय स्पष्ट असल्याने त्यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचा श्रीगणेशा केला. मंडळाचे अध्यक्षपद भूषवताना सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, साहित्यिक यांसारख्या विषयांवरही काम सुरू केले. या मंडळाच्या वतीने सामाजिक हिताच्या उदात्त हेतूने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विशेष म्हणजे हे मंडळ अनेकांच्या जीवनात प्रकाश आणणारी ज्योत ठरले आहे याचाही यानिमित्ताने आवर्जून उल्लेख करायला हवा.
व्यापक समाजसेवेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक व नगराध्यक्षही झाले. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणि पनवेलच्या विकासपर्वाला खर्या अर्थाने प्रारंभ झाला. तोपर्यंत पनवेल हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे विकासाला बराच वाव होता. योग्य वेळी, योग्य माणसाकडे पनवेलची धुरा आली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी झपाटल्यागत काम करून मिळालेल्या संधीचे अक्षरशः सोने केले. त्यांच्या याच कामाची झलक पाहून पुढे त्यांना जनतेने आमदार केले. मग विकासाचा आणखी एक अध्याय सुरू झाला. त्यांच्याचमुळे विकास म्हणजे काय असतो हे ग्रामीण भागातील जनतेला माहीत झाले. त्याआधी पनवेलचा ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा हा अनुशेष भरून काढत गाव, खेडी, वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा पोहचवून तेथील लोकांना मूळ प्रवाहात आणले.
आधीच मध्यवर्ती ठिकाण आणि त्यात विविध प्रकल्प साकारू लागल्याने पनवेल परिसरात राज्याच्याच नव्हे; तर देशाच्या कानाकोर्यातून लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास येऊ लागले. त्यामुळे येथील नागरीकरण झपाट्याने वाढून नागरी सेवा आणि एकूणच जनजीवनावर ताण पडू लागला. ते ध्यानात घेत पनवेल महापालिका व्हावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी केली व त्यासाठी पाठपुरावाही केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पनवेल नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक निधी आणि सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
असे हे ध्येयनिष्ठ आमदार प्रशांत ठाकूर सतत कार्यमग्न असतात. सकाळी लवकर त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री उशिरा संपतो. दररोज असंख्य लोकं त्यांच्याकडे वेगवेगळी कामे घेऊन येत असतात. ते ती समजावून घेत मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. कामाचा एवढा प्रचंड रेटा असतानाही ते न थकता कार्यरत असतात. विशेष म्हणजे त्यांच्यात विलक्षण ऊर्जा दिसून येते. त्यांचा आणखी एक स्वभावगुण म्हणजे शिकण्याची वृत्ती. आज एवढ्या मोठ्या स्तरावर काम करीत असतानाही ते सातत्याने नवनवीन गोष्टी आत्मसात करीत असतात. बदलते तंत्रज्ञान अवगत करतात, जेणेकरून काम करताना सुधारणा करता येईल.
स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक प्रतिमा, विकासाची दूरदृष्टी, अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटी या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी यशाची अनेक शिखरे गाठली आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली असून यंदा ते विजयाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांची कार्यशैली आणि आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहता त्यांच्यात राज्याचेही प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे, हे समस्त पनवेलकरांसह रायगडवासीयही जाणतात.
आपला वाढदिवसदेखील आमदार प्रशांत ठाकूर जनसेवेत समर्पित करतात. यावरून त्यांची उच्च विचारसरणी ठळकपणे अधोरेखित होते. अनेकदा आपण पाहतो की, नेतेमंडळी आपला वाढदिवस मित्रपरिवारासमवेत धूमधडाक्यात साजरा करतात. आता कुणी कसा वाढदिवस साजरा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर हे विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेलाच भेट (गिफ्ट) देतात. त्यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेला आरोग्य महाशिबिराचा स्तुत्य उपक्रम गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी या महाशिबिराव्यतिरिक्त वृक्षारोपणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. आपण सर्वांनी सरलेला उन्हाळा किती उष्ण होता हे अनुभवले. अलिकडच्या काही वर्षांत हवामानात बदल होऊन उष्म्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषतः उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही अवघड होऊन जाते. ते लक्षात घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक, भेटवस्तू, पुष्पगुच्छ न आणता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धाचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.
जनसेवेचा अखंड वसा घेतलेले सुजाण आमदार प्रशांत ठाकूर यांचा यंदा 50वा वाढदिवस आहे. त्यांनी यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत आणि त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडत रहावी यासाठी उत्तम व दीर्घायुष्याच्या त्यांना सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
-समाधान पाटील, वृत्त संपादक, दै. रामप्रहर
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …