अलिबाग : जिमाका
शासन आणि जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी (दि. 29) कुरूळ येथे केले. कातकरी उत्थान अभियानांतर्गत कुरुळ (ता. अलिबाग) ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर बोलत होते. कोविडचे संकट अजून टळले नसून ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशा आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेवटच्या आदिवासी बांधवांपर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आदिवासी उत्थान अभियान यशस्वी होणार नाही, त्याकरिता सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांनी आदिवासी बांधवांना शक्यती मदत करावी, असे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी सांगितले. तहसीलदार मीनल दळवी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी 78 आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात आले. 17 आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. 12 आदिवासी बांधवांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर 10 आदिवासी बांधवांचे नवीन शिधापत्रिका मिळण्याकरिता अर्ज भरून घेण्यात आले. भगवान नाईक यांनी आभार मानले.